पाणी तोडण्याच्या धमकीनंतर PMC'ने भरले 3.5 कोटींचे बिल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

काही महिन्यांपूर्वीच महापालिका अधिक पाणी वापरत असल्याचा दावा करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने पर्वतीचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढे चार ते पाच दिवस विस्कळित झाला होता.

पुणे : महापालिकेकडून ७३ लाख रुपयांचे बिल राहिल्याने शहराचे पाणी तोडण्याची धमकी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी हस्तक्षेप झाल्याने रात्री उशीरा यावर पडदा पडला.

महापालिकेकडून जलसंपदा विभागाला साडेतीन कोटी आणि ७३ लाख अशी दोन बिले द्यायची होती. त्यापैकी, साडेतीन कोटी रुपयांच्या बिलाचा धनादेश दिला. मात्र, त्यांनी धनादेश घेण्यास नकार देऊन त्यानुसार रोख पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर पालिकेने RTGS च्या माध्यमातून संबंधित रक्कम जलसंपदा विभागाच्या खात्यात जमा केली. मात्र ७३ लाखांचे बिलही सायंकाळपूर्वीच द्या, असा हेका अधिकाऱ्यांनी लावला.

या बिलाची प्रशासकीय मान्यताही अद्याप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ती रक्कम देता आली नाही. त्यावेळी शहराचा शनिवारी पाणीपुरवठा तोडण्याची धमकी त्या अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी अखेर पालिकेच्या अधिकाऱयांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.

काही महिन्यांपूर्वीच महापालिका अधिक पाणी वापरत असल्याचा दावा करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने पर्वतीचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढे चार ते पाच दिवस विस्कळित झाला होता.

विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. आता, पुन्हा जलसंपदा विभागाने बिलाच्या रकमेची पूर्तता केली नाही म्हणून पाणी तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.  शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून, त्याचे शुल्क पालिकेतर्फे भरण्यात येते.