भाजपने पाडले शिवसेनेला खिंडार 

भाजपने पाडले शिवसेनेला खिंडार 

गेली 40 वर्षे शिवसेनेची गढी बनलेल्या कोथरूडला खिंडार पाडत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 12 (मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी)मध्ये तीन जागा जिंकल्या. शिवसेनेने सर्वस्व पणाला लावल्याने या प्रभागातील चौथी जागा त्यांच्या पदरात पडली. 

या प्रभागात शिवसेनेचे श्‍याम देशपांडे आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ; तसेच शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार आणि भाजपचा नवा चेहरा ऍड. मिहीर प्रभुदेसाई या लढतीकडे पुण्याचे लक्ष लागले होते. त्यात मोहोळ आणि सुतार यांनी बाजी मारली. 

भाजप-शिवसेनेची 1990 मध्ये युती होताना तत्कालीन शिवाजीनगर मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मुद्दा ठरला होता. त्या वेळी भाजपचे तत्कालीन आमदार अण्णा जोशी यांची जागा शिवसेनेच्या शशिकांत सुतार यांना दिली. तेथून 25 वर्षे या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले. युती तुटल्यानंतर, कोथरूड मतदारसंघात भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला. त्यामुळे कोथरूड गावठाण व लगतच्या परिसरात म्हणजे प्रभाग क्रमांक 12 मध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे प्रचार सभा घेतल्या; तर माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी हा प्रभाग प्रचार करीत अक्षरशः पिंजून काढला. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शास्त्रीनगर, आझादनगर भागात सुतार यांनी आघाडी घेतली; तर मोहोळ यांनीही आघाडी घेतली. या भागात मनसेनेही चांगली मते मिळविली. मयूर कॉलनी परिसरात मोहोळ यांनी आघाडी वाढवीत साडेपाच हजार मतांवर नेली. या तिसऱ्या फेरीच्या अखेरीला प्रभुदेसाई यांनी सुतार यांची आघाडी कमी केली. त्या वेळी सुतार केवळ 267 मतांनी आघाडीवर होते. चौथी फेरी गुजरात कॉलनी, भेलकेनगर, कोथरूड गावठाण परिसरात होती. तेथे सुतार यांनी एकवीसशे मतांचे आधिक्‍य मिळविले; तर देशपांडे आणि मोहोळ यांच्या मतांत जेमतेम 80 मतांचा फरक राहिला. शेवटच्या दोन फेऱ्या डहाणूकर कॉलनी परिसरातील होत्या. तेथे देशपांडे यांच्यापेक्षा मोहोळ यांना 183 मते जास्त मिळाली. या भागात देशपांडे यांचा प्रभाव होता. तेथे त्यांना मोहोळ यांची आघाडी तोडता आली नाही. त्यामुळे त्यांचा सहा हजार 879 मतांनी पराभव झाला. 

पाचव्या फेरीच्या अखेरीला सुतार यांची आघाडी दोन हजार 841 मतांची होती. शेवटच्या या दोन फेऱ्यांमध्ये प्रभुदेसाई यांनी सुतार यांच्यापेक्षा दोन हजार मते जास्त मिळाली. मात्र, पहिल्या पाच फेऱ्यांतील मताधिक्‍य तोडण्यास ती पुरेशी ठरली नाहीत. त्यामुळे शेवटी सुतार 796 मतांनी विजयी झाले. सुतार व प्रभुदेसाई यांच्या "ड' गटात मनसेचा उमेदवार नव्हता. त्याचाही फायदा सुतार यांना झाला. शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित करताना विद्यमान नगरसेवक योगेश मोकाटे यांना उमेदवारी नाकारली. त्याचीही नाराजी काही प्रमाणात प्रभागात होती. भाजपने उमेदवारी निश्‍चित करताना शेवटच्या क्षणी शिवसेनेचे नवनाथ जाधव यांच्या पत्नी वासंती जाधव यांना उमेदवारी दिली. त्याचाही परिणाम मतविभागणीत झाला. या परिसरातील भाजपची लाट; तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठीराखे यांचा फायदा भाजपला झाला. 

महिलांच्या गटामध्ये भाजपच्या हर्षाली माथवड यांनी शिवसेनेच्या शांता भेलके यांचा नऊ हजारांच्या मताधिक्‍याने; तर भाजपच्या वासंती जाधव यांनी शिवसेनेच्या कांचन कुंबरे यांचा सुमारे 14 हजार मतांनी पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com