राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान कोणाचे? 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान कोणाचे? 

सोसायट्यांचा सुमारे 80 टक्के आणि वस्ती विभागाचा 20 टक्के भाग असलेल्या राजीव गांधी उद्यान, बालाजीनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना आव्हान कोणाचे? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेसमध्येही तुल्यबळ इच्छुकांची संख्या मोठी आहे. 

केके मार्केट, सातारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी रस्त्यादरम्यान नव्याने झालेल्या या प्रभागात चैत्रबन, सुखसागरनगर, लेक टाऊन, राजीव गांधीनगर, राजस सोसायटी, बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, पुण्याईनगर आणि कात्रजच्या काही भागाचा समावेश झाला आहे. त्यातील राजीव गांधीनगर, चैत्रबन हा वस्ती विभाग असून बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, पुण्याईनगरमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. या भागात लेक टाऊन, राजस सोसायटी, महालक्ष्मी, पर्पल कॅसल आदी सोसायट्यांतही मतदार मोठ्या संख्येने आहेत. 

नव्याने झालेल्या या प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रेय धनकवडे, नगरसेविका सुवर्णा पायगुडे यांचा जुना बहुतांश प्रभाग, तर कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजित कदम आणि शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना थोरवे यांचाही मोठा भाग आहे. लगतच्या प्रभागातील नगरसेवक वसंत मोरे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती कदम यांच्या जुन्या प्रभागातील सुमारे 30 टक्‍क्‍यांहून अधिक भाग या नव्या प्रभागाला जोडला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे या भागात प्राबल्य असून त्यांचे तीन विद्यमान सदस्य प्रभागातून उभे राहण्याची शक्‍यता आहे. 

आमदार भीमराव तापकीर यांनी या प्रभागातून भाजपचे पॅनेल निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनपेक्षित तुल्यबळ उमेदवार ते येथून उभा करू शकतात, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे. या परिसरात भाजपने संघटनात्मक बांधणी चांगली केली असून, "इन्कमिंग'च्या जोरावर प्रभाग जिंकण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेकडे युवा कार्यकर्त्यांची कुमक अधिक आहे, तर मनसेचे मूळ येथे चांगले रुजले आहे. कॉंग्रेसचे जुने मतदार या प्रभागात आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेसची भिस्त आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध अन्य पक्ष, अशी लढत होणार आहे. त्यामुळेच उमेदवारीसाठी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही चुरस आहे. 

- राष्ट्रवादी कॉंग्रेस ः दत्तात्रेय धनकवडे, सुवर्णा पायगुडे, भारती कदम, प्रकाश कदम, रायबा भोसले, राणी भोसले, संध्या बर्गे, संगीता दिघे, गणेश मोहिते 
- भाजप ः सुनील भिंताडे, दिगंबर डवरी, विकास लवटे, नितीन राख, ऍड. तुषार काळे, रत्नमाला काळे, किशोर ढमाळ, विजय दरडिगे, ज्योती ढमाळ, सुहास शेलार 
- शिवसेना ः दीपाली ओसवाल, अभिजित शिवंगणे, सारंग धावणे, विनायक वाळके, अनिता वाळके, सुरेश पवार, सरोज कारवेकर, मनीषा कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, सुवर्णा कुलकर्णी 
- कॉंग्रेस ः सचिन कदम, मोहन इंडे, विकास बोडसिंग, राज अंबिके, संजय अभंग, रेखा कदम
- मनसे ः राजाभाऊ कदम, मंगेश रासकर, सचिन काटकर, गणेश नायकवडे, तनुजा रासकर, विजय पायगुडे, कल्पना जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com