तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत 

prabhag34
prabhag34

प्रभागाची झालेली पुनर्रचना, स्थानिक नेतृत्व, जातीच्या राजकारणाचा समतोल साधून सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी या प्रभागातून उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आठ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली असली तरीही या प्रभागातून दोन्ही पक्षांनी उमेदवार देऊन मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी चारही जागांवर उमेदवार दिले आहेत, तसेच दोन अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या प्रभागात तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे. 

सिंहगड रस्त्यावरील हिंगण्यातून मागील निवडणुकीत विजयी झालेले मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे विद्यमान उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. दोनचा प्रभाग बदलून चार उमेदवारांचा झाल्याने त्याचा थेट परिणाम म्हणून मागच्या वेळच्या प्रभागाच्या भौगोलिक सीमांचा विस्तार झाला आहे. सनसिटीसारखा वेगाने विकसित झालेला भाग गेल्या निवडणुकीत वडगाव-धायरी प्रभागात होता. तो आता या प्रभागाला जोडला गेला आहे, त्यामुळे नवीन मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान या सर्व उमेदवारांसमोर आहे. 

राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून पुण्यात स्थायिक झालेला मतदार येथे आहे, तसेच शहराच्या मध्य वस्तीतून या भागात राहायला आलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचबरोबर यातील बहुसंख्य उमेदवार या भागातील स्थानिक नागरिक असल्याने त्यांचे नात्यागोत्यांचे मतदान अशा पार्श्‍वभूमीवर या प्रभागातील निवडणूक होत आहे. शिक्षित, सोसायट्यांमध्ये राहणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा मतदार हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. 

या प्रभागातून उमेदवारी देताना सर्व जातींच्या आणि सर्व भागांना प्रतिनिधित्व मिळेल, याची काळजी सर्वच पक्षांनी घेतल्याचे दिसते. त्यामुळे हिंगणे, सनसिटी रस्ता, माणिक बाग अशा दोन्ही भागांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. 

राजू चव्हाण, कमल निवंगुणे, अनुराधा साळुंके आणि चैतन्य पुरंदरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मैत्रिपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब कापरे, जयश्री जगताप, माधुरी कडू आणि शैलेश चरवड यांना अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. भाजपने मंजूषा नागपुरे, ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रसन्न जगताप यांना तिकीट दिले आहे. संतोष गोपाळ, पल्लवी पासलकर, पौर्णिमा निंबाळकर आणि जयसिंग दांगट हे उमेदवार शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वीरेंद्र सैंदाणे, आरती देशपांडे, सुशीला मोरे आणि पांडुरंग मण्यारे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून बाळासाहेब कोकरे आणि भवेश पिंपळकर हे उमेदवार असून, पद्मा कांबळे आणि सचिन मुंगारे अपक्ष लढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com