घड्याळाचे काटे पीएमपीत उलटे

घड्याळाचे काटे पीएमपीत उलटे

पुणे - पीएमपीमध्ये क्‍लीनर पदाची भरती करण्यासाठीची पात्रता ‘आयटीआय’ प्रशिक्षितवरून चक्क सातवी उत्तीर्ण करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयावर राजकीय, स्वयंसेवी संस्था, वाहतूक व्यवसाय आदी विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली आहे. संचालक मंडळाचा हा निर्णय म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचा प्रकार आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. 

पीएमपीची संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. त्यात पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे अनुक्रमे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ढब्बू आसवानी, संचालक आनंद अलकुंटे, प्रभागी व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार आदी उपस्थित होते. पीएमपीमध्ये नजीकच्या काळात क्‍लीनरच्या पदाच्या ९०० जागांवर भरती होणार आहे. 
 

या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाने क्‍लीनरची पात्रता आयटीआयवरून चक्क सातवी उत्तीर्णपर्यंत खाली आणली आहे. 

पीएमपीमध्ये १९९७ पासून क्‍लीनरपदासाठी आयटीआय प्रशिक्षितच उमेदवार घेतले जातात. सुमारे दोन वर्षांपूर्वी १२० क्‍लीनरची भरती झाली होती. त्यातही आयटीआय उत्तीर्ण उमेदवारच घेण्यात आले आहेत. क्‍लीनर म्हणून घेतलेल्या उमेदवाराला तांत्रिक विभागांतील प्रशिक्षण दिले जाते.

त्यानंतर त्याला हेल्परची बढती मिळते. त्यानंतर तो फिटर आणि सुपरवायझर पदापर्यंत काम करू शकतो. तांत्रिक पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवार कनिष्ठ अभियंत्याचेही काम काही प्रमाणात करू शकतो. मात्र, केवळ सातवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला हेल्परच्या पुढे बढती मिळत नाही. त्यामुळे त्याचेही नुकसान होऊ शकते. तसेच संचालक मंडळाच्या बैठकीत क्‍लीनरची पात्रता कमी करण्याचा ठराव प्रशासनाने मांडलेला नव्हता. मात्र, संचालक मंडळाने स्वतःहून पात्रता कमी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात १५५० बस येणार आहेत. त्यात आधुनिक तंत्रज्ञान असेल. त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आयटीआय प्रशिक्षितच उमेदवार हवेत, असे प्रशासनाचेही म्हणणे आहे. मात्र, संचालक मंडळ त्यांच्या निर्णयाची दुरुस्ती करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. याबाबत महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘क्‍लीनरच्या पात्रतेबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. बसची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने व्हायला हवी. झालेल्या निर्णयाबाबत संचालक मंडळातील अन्य सदस्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.’’

नव्या बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आवश्‍यक आहे. त्यामुळे क्‍लीनरच्या भरतीमध्ये आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांनाच प्राधान्य द्यायला हवे. अशा उमेदवारांचा भविष्यात पीएमपीलाच जास्त उपयोग होऊ शकतो. 
-प्रसन्न पटवर्धन, वाहतूक व्यावसायिक

आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या बसची देखभाल दुरुस्ती ही आयटीआय प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हायला हवी. केवळ सातवी उत्तीर्ण उमेदवार बसची देखभाल कशी करू शकेल? संचालक मंडळाने त्यांच्या निर्णयात बदल करावा, यासाठी माझा प्रयत्न असेल.
-वंदना चव्हाण, खासदार व शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस

क्‍लीनरची पात्रता कमी करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यात तातडीने बदल करणे गरजेचे आहे. केवळ राजकीय सोय न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे राजकीय पक्षांनीही बघितले पाहिजे. हवे तेव्हा पात्रतेच्या अटी कमी करून पीएमपीचा खेळखंडोबा करण्याचा हा प्रकार आहे. त्याला पुणेकरांनी तीव्र विरोध केला पाहिजे.
-विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com