पीएमपी, मेट्रोचा समन्वय साधणार - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

कात्रज/कोंढवा - पीएमपीएल आणि मेट्रो यांचा समन्वय साधणारी आणि वाहतूक कोंडीतून पुणेकरांना कायमचं सोडवणारी स्थायी यंत्रणा उभारण्याची व्यवस्था भविष्यात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कात्रज/कोंढवा - पीएमपीएल आणि मेट्रो यांचा समन्वय साधणारी आणि वाहतूक कोंडीतून पुणेकरांना कायमचं सोडवणारी स्थायी यंत्रणा उभारण्याची व्यवस्था भविष्यात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोंढवा बुद्रुक येथील आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महापौर प्रशांत जगताप, पालिका आयुक्त कुणाल कुमार, योगेश गोगावले, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, अनिल येवले, ज्ञानेश्वर पोकळे, संभाजी कामठे, सुनील कामठे आदी उपस्थित होते. 

कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक १८ मधील अग्निशामक केंद्र, सर्व्हे क्रमांक १४ येथील महापालिकेचा दवाखाना आणि सर्व्हे क्रमांक ६५ मधील मराठी उर्दू 
माध्यमाच्या शाळेचे उद्‌घाटन या वेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. 

बापट म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानत सर्वांना समान न्याय देत मुख्यमंत्र्यांची वाटचाल सुरू आहे. यापुढे सर्वसामान्यांची हालअपेष्टा संपुष्टात येणार आहे.’’

योगेश टिळेकर म्हणाले, ‘‘शहराच्या पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महापालिका व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कात्रज ते थेऊर या २३ किलोमीटर अंतरावरील रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २५० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, येत्या सहा महिन्यांत काम सुरू होईल. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लुल्लानगर उड्डाण पुलाच्या कामाला गती दिली. ज्यामुळे कोंढवा हडपसर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे.’’ 

या वेळी हडपसर व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याला देशातील प्रमुख शहर बनवणार
पुणे शहराची स्वतःची मोठी क्षमता आहे. हे शहर कधीच मागे राहू शकत नाही. मात्र गेल्या पंधरा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. मात्र, पुण्याला देशातील प्रमुख शहर बनवण्याचा विडा पंतप्रधान मोदी यांच्यासह आम्ही सर्वांनी उचलला आहे. पुणेकर या विचाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.