‘पीएमपी’ची सेवा प्रवासीकेंद्रित करणार - तुकाराम मुंढे

‘पीएमपी’ची सेवा प्रवासीकेंद्रित करणार - तुकाराम मुंढे

पुणे - ‘‘प्रवासीकेंद्रित आणि व्यावसायिक दर्जाची पीएमपीची सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मिळेल, अशा पद्धतीने कारभार करणार आहे,’’ अशी ग्वाही पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि पीएमपीच्या हितानुसारच दैनंदिन कारभारात निर्णय घेऊन त्यांची वेगाने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही शहरांत बीआरटीच्या मार्गांचा विस्तार करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मुद्यावरून नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची राज्य सरकारने नुकतीच बदली केली आणि त्यांना पीएमपीचे अध्यक्ष केले. मुंढे यांनी या पदाची सूत्रे स्वीकारणार की नाही, याबद्दल गेले दोन दिवस चर्चा सुरू होती. बुधवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून मुंढे यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिला. पीएमपीमध्ये काम करण्याची चांगली संधी असून, ही जबाबदारी प्रामाणिकपणाने आणि पारदर्शकपणे पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंढे यांनी दुपारी दीडच्या सुमारास पीएमपीमध्ये येऊन पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीएमपीच्या कामकाजाची माहिती घेतली. त्या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक दगा मोरे उपस्थित होते.

नवी मुंबईत आयुक्त म्हणून काम करताना परिवहन समितीचेही काम बघितले आहे. नवी मुंबईत सुमारे ५०० बस आहेत आणि दररोज तीन लाख प्रवासी त्या सेवेचा लाभ घेतात. या समितीचे काम बघतानाचा अनुभव पुण्यात नक्कीच उपयोगी पडेल. तेथे काही निर्णय घेऊन सुधारणा केल्या होत्या. त्या धर्तीवर पुण्यातील कामकाज समजून घेतल्यावर काही निर्णय घेतले जातील. अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी पीएमपीची सखोल माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच धोरणात्मक बाबींवर बोलता येईल, असेही मुंढे यांनी सांगितले.

पीएमपी कंपनी असून संचालक मंडळातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज करणार आहे. पीएमपीचा पसारा मोठा असून १०- १२ लाख प्रवासी आहेत. २१०० बस असूनही पीएमपीची दुरवस्था का झाली, याची कारणे पहिल्यांदा शोधणार आहे. सेवा पुरविण्यात पीएमपी कमी का पडते, बस वारंवार बंद का पडतात, उत्पन्न कमी का होत आहे आदींची माहिती घेऊन त्यानुसार उपाययोजना करणार आहे.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
 

जमेच्या बाजू भक्कम; खर्चात कपात
कोणतीही कंपनी चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी जमेच्या बाजू भक्कम करणे आणि खर्चात कपात करणे आवश्‍यक असते. पीएमपीचीही त्याबाबत परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेऊ. जगातील सर्वच प्रमुख शहरांत सार्वजनिक वाहतूक सेवेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मेट्रोसाठी पाच वर्षे लागणार आहेत. दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीलाच महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. या दोन्ही शहरांत बीआरटीचा विस्तार करणेही गरजेचे आहे, पीएमपीही मेट्रोला पूरक असेल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.
 

या तर निव्वळ वावड्या...
पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर आपण नाराज झाला होता का, असे विचारले असता मुंढे म्हणाले, ‘‘मी नाराज झालो, या निव्वळ वावड्या आहेत. नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून सोमवारी कार्यमुक्त झालो. मंगळवारी गुढीपाडव्याची सुटी होती आणि बुधवारी पीएमपीत रुजू झालो. यामध्ये नाराजीचा प्रश्‍न येतोच कोठे?’’ माझे काम करताना राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्‍नच येत नाही. पीएमपीच्या हिताचे निर्णय घेताना संचालक मंडळात सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.
 

डॉ. परदेशी यांचे उपक्रम सुरू ठेवणार
पीएमपीच्या चार महिन्यांच्या कार्यकाळात डॉ. श्रीकर परदेशी यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. तसेच तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या पीएमपीबद्दल काय अपेक्षा आहेत, हेही समजून घेणार आहे. त्यांच्या अपेक्षांचीही दखल घेऊन कामकाज करण्यात येईल. पीएमपीसाठी आवश्‍यक असलेले निर्णय अभ्यासाअंती घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com