दिवाळीत पीएमपी उजळणार!

दिवाळीत पीएमपी उजळणार!
दिवाळीत पीएमपी उजळणार!

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या 1550 बसगाड्यांपैकी 650 बसगाड्या येत्या दोन 

महिन्यांतच पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील. कर्जाद्वारे घ्यायच्या 900 बसगाड्या येण्यास चार महिन्यांनी सुरवात होईल. म्हणजेच निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच डिसेंबरअखेरीस पुणेकरांना पुन्हा दिवाळीचा आनंद मिळणार आहे. 

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पीएमपीकडे अखेर लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले असून, खरेदी आणि भाडेतत्त्वावर 1550 बस घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी रात्री ठराव मंजूर केला. यानंतरची प्रक्रिया कशी राहील, प्रत्यक्षात बसगाड्या कधी येतील, याबाबतची माहिती घेतली असता येत्या दोन महिन्यांतच पुणेकरांना नव्या बसगाड्यांचा लाभ मिळण्यास सुरवात होणार असल्याचे स्पष्ट झाले. महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या बस खरेदीची निविदा आठ दिवसांत प्रसिद्ध होईल. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीनेही याबाबतचा ठराव मंगळवारी मंजूर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही शहरांसाठी आता 1550 बस खरेदी होणार आहे. त्यातील 550 बस भाडेतत्त्वावर, 900 बस अल्प व्याजदराने उपलब्ध होणाऱ्या वित्तपुरवठ्यातून आणि 100 बस दोन्ही महापालिका 

खरेदी करणार आहेत. बस खरेदीसाठी पीएमपीचे अध्यक्ष, दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि "एसआरटीयू‘च्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे. तिच्यामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती महापौरांनी दिली. भाडेतत्त्वावरील 550 एसी बस दोन महिन्यांत येण्यास 

सुरवात होईल तर, खरेदीच्या बस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. त्याची आचार संहिता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू होईल. तत्पूर्वी सर्व बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असेही महापौरांनी सांगितले. 

स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा अश्‍विनी कदम यांनी यासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून 60 बस खरेदी करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या 26 कोटी रुपयांच्या निधीतून 40 बस खरेदी होतील. त्यासाठी आठ दिवसांत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दरम्यान, बस खरेदीबाबत राजकीय सहमती घडविण्यासाठी महापौर जगताप यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशीही त्यांनी संवाद साधला होता. तसेच अन्य पक्षांबरोबरही चर्चा केली. त्यातून सहमती निर्माण झाल्यामुळे बस खरेदीचा निर्णय सभागृहात एकमताने मंजूर झाला. 

बस खरेदीसाठी भाजप आग्रही 

भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ""शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आग्रही आहेत. त्यामुळेच पक्षीय राजकारण न करता शहराची गरज ओळखून भाजपने बस खरेदीला पाठिंबा दिला. तसेच बस तातडीने म्हणजेच तीन-चार महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत रुजू व्हाव्यात म्हणून उर्वरित प्रक्रियेसाठीही भाजप पाठपुरावा करणार आहे.‘‘

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com