#Pmpml पीएमपीच्या 140 बस पडल्या बंद 

514_338_1510_1374.jpg
514_338_1510_1374.jpg

पुणे : मुसळधार पावसाचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही सोमवारी झाला. मध्यभागात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यातच पीएमपीच्या तब्बल 140 बस सायंकाळपर्यंत शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये बंद पडल्या होत्या, त्यामुळे कोंडीत भर पडून शहरातील वाहतूक धिमी झाली होती. एसटीच्याही पुणे- मुंबई मार्गावरील 26 फेऱ्या रद्द झाल्या. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरळीत होती. 


पाऊस सोमवारी पहाटेपासूनच पडत असल्यामुळे सकाळपासूनच वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यात आठवड्याचा पहिला दिवस असल्यामूळे आणि शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. पावसामुळे काही चौकातील सिगनलचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, कोंडी वाढत होती. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि तांत्रिक दोषामुळे पीएमपीच्याही सुमारे 140 बस दिवसभरात ठिकठिकाणी बंद पडल्या.

कंत्राटदारांच्या भाडेतत्त्वावरील 90, तर पीएमपीच्या 50 बसचा त्यात समावेश होता. कोंडी झालेली असताना, बस बंद पडत असल्यामुळे त्यात आणखी भर पडत होती. परिणामी शहरातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आदी ठिकाणी गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. कोंडीमुळे पीएमपीच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा पीएमपीच्या बसच्या उशिरा धावत होत्या, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. पुण्यातील रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम झालेला नाही. सर्व रेल्वे गाड्या वेळेनुसार धावत आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. 


मुंबईच्या 24 फेऱ्या रद्द 
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एसटी गाड्यांच्या 24 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ज्या गाड्या सोडल्या आहेत, त्यामध्ये प्रवाशांची संख्या खूप कमी होती. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे गाड्यांना सुमारे दोन तास विलंब होत आहे. कोल्हापूर, सांगलीची एसटी वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती स्वारगेट आगार व्यवस्थापक प्रदीपकुमार कांबळे यांनी दिली. 

पुणे-मुंबई दरम्यानच्या साधारण 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याने गाड्यांना दोन तासापर्यंत विलंब झाला. अशी माहिती पुणे स्टेशन बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक बी. एस. तारू यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com