पीएमपीच्या जादा बस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - रिक्षा संपाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पीएमपी प्रशासनाने मंगळवारी (ता. 31) सुमारे 250 जादा बस सोडण्याचे  नियोजन केले आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या आणि रजा एक दिवसासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. 

पीएमपीची शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 60 प्रमुख स्थानके आहेत. त्या ठिकाणी सुमारे 350 नियंत्रक काम करणार आहेत. एरवी कार्यालयात काम करणारे सुमारे 150 लेखनिकही विविध स्थानकांवर काम करणार आहेत. त्याशिवाय 60 तिकीट तपासणीसही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पीएमपीच्या बस अचानक बंद पडतात. त्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करून त्या मार्गावर आणण्यासाठी दहा आगारांच्या 10 आणि 7 अन्य अशा एकूण 17 क्रेन असतील. सकाळी आठ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊदरम्यान शहरातील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, हे लक्षात घेऊन त्या वेळात पीएमपीचे जास्तीत जास्त कर्मचारी विविध स्थानकांवर असतील आणि जास्तीत जास्त बस मार्गांवर धावतील, या पद्धतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. संपाच्या पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या 1700 ते 1750 बस मंगळवारी धावतील, अशा पद्धतीने रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.