संपूर्ण भरणे टोळी तडीपार पोलिसांची मोठी कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पिंपरी - हिंजवडी, माणसह मावळ तालुक्‍यात मोठी दहशत असलेल्या कुप्रसिद्ध राकेश भरणे टोळीला पुढील दीड वर्षासाठी वाकड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातही अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या टोळीला एका राजकीय नेत्याचे पाठबळ आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत संपूर्ण गुंड टोळीच तडीपार करण्याच्या या मोठ्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहर व परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

टोळीप्रमुख राकेश भरणे (रा. डांगे चौक, थेरगाव) चेतन निकाळजे (रा. म्हातोबानगर) अनिल मोहिते (दत्त मंदिराजवळ, वाकड), विजय भोसले (रा. माणगाव, मुळशी), दिलीप ऊर्फ आबा सुदाम धुमाळ, प्रशांत बाबूमंदू, चंद्रकांत बिरसिंग थापा (रा. माण), सचिन धुमाळ (रा. घोटावडे), सूरज वाडघरे, दिनेश यादव (रा. पिंपरी) रवींद्र धुमाळ ( रा. घोटावडे, मुळशी), संजय कुमकर (रा. कासारवाडी), अशोक सावंत (रा. तळेगाव दाभाडे) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. 

सध्या सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये या टोळीचा त्रास होण्याची शक्‍यता गृहीत धरून तिला तडीपार करण्याचा प्रस्ताव वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी तयार केला. त्याला पोलिस उपायुक्त (परिमंडळ तीन) गणेश शिंदे यांनी मान्यता दिली. भरणे टोळी माण, हिंजवडीमध्ये सक्रिय आहे. बेकायदा जमीन खरेदी-विक्री व्यवहारामुळे तिचा या परिसरात मोठा दबदबा आहे. या टोळीतील काही सदस्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्याविषयी माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. 

""महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस परिमंडळ तीनमधील साठ गुन्हेगारांना गेल्या दोन महिन्यांत तडीपार करण्यात आले असून, आणखी काही जणांविरुद्ध ही कारवाई होणार आहे.'' 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन