सोनसाखळी चोरीला जाणं वेदनादायी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - ""चोरट्याने महिलेची सोनसाखळी हिसकावल्यास मनाला वेदना होतात; परंतु चोरीस गेलेले दागिने परत मिळवून देण्यासाठी पोलिस वचनबद्ध आहेत. पोलिसांवर विश्‍वास ठेवा. तसेच, स्वत: महिलांनीही मौल्यवान दागिने परिधान करताना आवश्‍यक खबरदारी घ्यावी,'' असे भावनिक आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले. 

पुणे - ""चोरट्याने महिलेची सोनसाखळी हिसकावल्यास मनाला वेदना होतात; परंतु चोरीस गेलेले दागिने परत मिळवून देण्यासाठी पोलिस वचनबद्ध आहेत. पोलिसांवर विश्‍वास ठेवा. तसेच, स्वत: महिलांनीही मौल्यवान दागिने परिधान करताना आवश्‍यक खबरदारी घ्यावी,'' असे भावनिक आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले. 

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात सोमवारी "रेजिंग डे'निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शुक्‍ला यांच्या हस्ते जबरी चोरी आणि घरफोडीच्या 76 गुन्ह्यांतील जप्त केलेला 170 तोळे सोने आणि अडीच किलो चांदीच्या दागिन्यांचा ऐवज संबंधितांना परत करण्यात आला. सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्‍त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त दीपक साकोरे, श्रीकांत पाठक, सुधीर हिरेमठ, डॉ. बस्वराज तेली, कल्पना बारावकर, पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्यासह इतर पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

शुक्‍ला म्हणाल्या, ""गेल्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत विविध गुन्ह्यांतील जप्त केलेला दोन कोटी 67 लाख रुपयांचा ऐवज संबंधित नागरिकांना परत करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस 24 तास उपलब्ध आहेत.'' 

या वेळी ज्योत्स्ना ननावरे, अमरावती चांडक, बाळकृष्ण चव्हाण, अनुराधा अत्रे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

वाढत्या गुन्हेगारींमुळे सकाळी फिरायला जाणे धोकादायक वाटत होते; परंतु पोलिसांनी उपाययोजना केल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. पत्नी स्नेहलता यांचे तीन महिन्यांपूर्वी भरत नाट्य मंदिराजवळ मंगळसूत्र चोरीस गेले होते; परंतु पोलिसांनी ते परत मिळवून दिले. त्यामुळे पोलिसांवरील विश्वास दुणावला आहे. 
- त्र्यंबक आपटे, माजी नगरसेवक 

वाढदिवसाची मिळाली भेट 
चिंचवड येथे चोरट्याने माझी 29 सप्टेंबर रोजी सोनसाखळी हिसकावली होती. जानेवारी महिन्यात माझा वाढदिवस असतो. पोलिसांनी माझा ऐवज परत मिळवून मला वाढदिवसाची भेटच दिली आहे. 
- पद्मा गोपीनाथ, नागरिक

Web Title: Police Commissioner Rashmi Shukla