बघा! रक्षक कसा जगतो!!

Pune-Police
Pune-Police

छोट्या खोल्या, छतामधून होणारी पाणीगळती आणि त्यामुळे विद्रूप झालेल्या भिंती, आजूबाजूला अस्वच्छता हे चित्र कुठल्याही झोपडपट्टीचं नाही. तुमचं-आमचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना सरकारने उदार मनाने देऊ केलेल्या पोलिस वसाहतींचं हे चित्र आहे. ज्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो, तोच पोलिस कशा अवस्थेत जगतो, हे पाहण्याची तसदी ना वरिष्ठ अधिकारी घेतात ना राजकीय नेते. ‘आम्हीही मतदार आहोत ना! मग किती दिवस आम्ही उपेक्षितांसारखं जगायचं,’ हा त्यांचा प्रश्‍न काळजाला भिडायला हवा... 

ब्रिटिशकालीन पोलिस वसाहत
ब्रिटिश काळापासून असलेल्या या वसाहतीत गळणारे पत्रे, फुटलेल्या फरशा, उचकटलेल्या भिंती, खराब रस्ते असे इथले चित्र आहे. सिमेंटच्या पत्र्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकून दिवस पुढे ढकलला जातो. ‘नवीन इमारत बांधायची आहे’ हे अामिष दाखवून ‘घरे तत्काळ सोडा’ अशी नोटीस अनेकदा पोलिसांना मिळाली. पण ‘पर्यायी व्यवस्था काय’,‘मुलांच्या शाळेचं काय’ या ‘क्षुल्लक’ प्रश्‍नांची उत्तरं कोण देणार? 

शिवाजीनगर पोलिस लाइन
वेळेवर स्वच्छता नाही, कचरा उचलला जात नाही, पाणी प्रश्‍न कायम आहे. ‘आमची समस्या जाणून घेण्यासाठी कुणीच येत नाही’, अशी इथल्या कुटुंबांची तक्रार आहे.

गोखलेनगर पोलिस लाइन 
वसाहतीसमोर प्रवेश मार्गावरच उघडी पावसाळी गटारे आहेत. वसाहतीला सीमाभिंत नसल्याने मोकाट जनावरे सर्रास फिरताना दिसतात. काही घरांच्या काचा फुटल्या आहेत आणि मुलांच्या खेळण्यांचा फक्त सांगाडच उरला आहे. 

खडक पोलिस लाइन 
ही कौलारू घरे पावसाळ्यात अक्षरश: गळतात. गटाराची झाकणे उघडल्यावर असल्याने दिवसभर दुर्गंधी पसरलेली असते. इथे पाण्याचा प्रश्‍न आहे. नाइट शिफ्ट करून आल्यावर पोलिस आधी पाणी भरायला कूपनलिकेवर जातात. क्रीडा कौशल्य असलेल्या मुलांसाठी खेळायला चांगली मैदाने आणि इतर सुविधांचीही वानवा आहे. 

स्वारगेट पोलिस वसाहत
मातीचे ढिगारे, रस्त्यावर टाकली बारीक खडी आणि सर्वत्र कचरा ही येथील स्थिती! इथल्या ७० टक्‍क्‍यांहून अधिक खोल्यांमध्ये गळती होते. चेंबर, सांडपाणी वाहिन्यांना उंदीर, घुशींनी पोखरले आहे. वरच्या मजल्यावरील खोल्यांना.

सोमवार पेठ पोलिस वसाहत
डोक्‍यावर, कमरेवर पाण्याचे हांडे या महिला घेऊन जातात. चार-चार दिवस पाणी येत नसल्याने तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पोलिसाची आई, पत्नी, छोटी मुलगी या कोपऱ्यावरून पाणी आणतात. डासांचा उच्छाद; पण औषध फवारणी होत नाही.

अशी आहे स्थिती
१३ - पुणे, पिंपरी चिंचवडमधील पोलिस वसाहती 
३,००० - सध्या उपलब्ध असलेली घरे 
९,००० - पोलिस सरकारी घरांच्या प्रतीक्षेत
९०० - उपलब्ध घरांपैकी ब्रिटिशकालीन घरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com