पोलिसांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे : संदीप बिष्णोई

police
police

दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज (ता. ४) एकोणसाठाव्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना संदीप बिष्णोई बोलत होते. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. तणावमुक्तीसाठी योगा, ध्यान, प्रार्थना, पूजा, आराधना करा. ताणाचे व्यवस्थापन करताना पोलिसांनी कुटुंबीयांशी संवाद साधावा आणि कुटुंबीयांनी देखील त्यांना सकारात्मक आधार द्यावा, असे आवाहन राज्याचे अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संदीप बिष्णोई यांनी व्यक्त केले आहे.

राज्य राखीव पोलिस दलाच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, उप महानिरीक्षक संदीप कर्णिक, प्रकाश मुत्याल, पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या मनिषा दुबुळे, समादेशक श्रीकांत पाठक, रामचंद्र केंडे, तानाजी चिखले, आदी अधिकारी उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षक डॅा. सुरेश मेखला यांनी प्रास्ताविक केले. नवप्रविष्ठ पोलिस पोलिस शिपाई उमेश डिघोळे यांनी दीक्षांत संचलनाचे नेतृत्व करीत शिस्तबध्द मानवंदना दिली. 

संदीप बिष्णोई म्हणाले, ''कायदा व सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती असून, त्या प्रगतीचे आपण भागीदार आहोत याची जाणीव ठेवावी. परंतु हे करताना स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र पोलिस दलातील शिपाई या नात्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नक्षलवादाचा बिमोड करणे, आपत्तीप्रसंगी शीघ्र प्रतिसाद देत सहाय्य करणे, कठीण प्रसंग हाताळण्यासाठीचे योग्य व्यवस्थापन, जमाव नियंत्रण, आदींची मोठी जबाबदारी शिपायांवर आहे. दंगल किंवा अन्य प्रसंगी राज्य राखीव पोलिस पोचल्याशिवाय राज्यातील पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना चैन पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे''.

ते पुढे म्हणाले, ''राज्य राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून आज ७२८ जवानांना राष्ट्रसेवेची संधी प्राप्त झाली आहे. भरतीनंतरचे औपचारिक प्रशिक्षण आज संपले असले तरी सेवाकाळात सातत्याने माहिती - तंत्रज्ञान, संगणकाचे अद्ययावत ज्ञान, अत्याधुनिक शस्त्रांची हाताळणी, आदींच्या निरंतर प्रशिक्षणातून क्षमतांचा विकास करावा. कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य गुंतवणूक आणि बचतीकडे लक्ष द्यावे''. 

प्रशिक्षण काळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शेहेबाज सय्यद (सोलापूर), गणेश टिमके (जालना), लक्ष्मण गिरी (जालना), रवींद्र गायकवाड (पुणे), गणेश बुरबुरे (सोलापूर), दिनेश चव्हाण ( नागपूर), प्रवीण रायबोले (नागपूर), प्रकाश कसलोड (धुळे), अल्ताफ शेख (दौंड), मारोती साळुंके (नागपूर) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अपर पोलिस महासंचालक यांच्याकडून प्रशिक्षण काळात आंतर व बाह्यवर्गात प्रथम क्रमांक संपादित करणार्या लक्ष्मण गिरी (जालना) या जवानास मानाची बॅटन व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 

सीताराम नरके यांनी सूत्रसंचालन केले. केंद्राचे उप प्राचार्य कैलास न्यायनीत यांनी आभारप्रदर्शन केले. 

संदीप बिष्णोई यांच्या पोलिस जवानांना सूचना 
- शिस्त हा दलाचा आत्मा, शिस्त मोडू नका. 
- घरचे वातावरण चांगले ठेवा.
- आई - वडील आणि पत्नीचा आदर करा.
- पौष्टिक आहार घ्या.
- व्यसनांपासून दूर राहा, शरीराचे वजन मर्यादेत ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com