पक्षांतराचे फटाके दिवाळीत फुटणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पुणे - दिवाळीची रंगत-संगत वाढत असतानाच राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला असून, प्रभागातील निवडणूक जिंकण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून पक्षांतर होण्याची शक्‍यता असून ते फटाके अल्पावधीतच फुटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. काही जणांनी उमेदवारी गृहित धरून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे, तर काही जण अजूनही संभ्रमात आहेत. काही इच्छुक दोन-तीन पक्षांकडे चाचपणी करून विजयाचे गणित जुळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

पुणे - दिवाळीची रंगत-संगत वाढत असतानाच राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला असून, प्रभागातील निवडणूक जिंकण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून पक्षांतर होण्याची शक्‍यता असून ते फटाके अल्पावधीतच फुटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. काही जणांनी उमेदवारी गृहित धरून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे, तर काही जण अजूनही संभ्रमात आहेत. काही इच्छुक दोन-तीन पक्षांकडे चाचपणी करून विजयाचे गणित जुळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

आरक्षणांची सोडत आणि प्रभागरचना सात ऑक्‍टोबरला जाहीर झाली. त्यानंतर आरक्षण आणि प्रभागरचना अनुकूल आहे का? याचा विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांकडून अभ्यास सुरू झाला. त्यानुसार आता राजकीय भूमिका निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार सदस्यांच्या प्रभागात सक्षम सहकारी मिळतील, याची काही इच्छुकांना खात्री नसल्यामुळे त्यांनीही अन्य पर्यायांवर खल सुरू केला आहे. काही जणांचा भाजपकडे ओढा असला तरी, त्यांच्या प्रक्रियेत "शब्द' मिळत नसल्यामुळे त्या इच्छुकांनी आता अन्य पर्यायांचाही विचार सुरू केला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचाही समावेश आहे. प्रसंगी ऐनवेळी "मनसे'कडून संधी मिळेल का, हेही ते तपासून बघत आहेत.

प्रभागरचना, आरक्षण यामुळे अडचणीत आलेले; परंतु निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी अनुकूल वाटत असलेल्या पक्षाच्या शहरावरील नेत्यांची थेट भेट घेऊन, तर काही जण हस्ते-परहस्ते निरोप पाठवून चाचपणी करीत आहेत. याबाबतची भूमिका उघडपणे जाहीर करण्यास हे इच्छुक सध्या तरी तयार नाहीत. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. आरक्षण अनुकूल झाल्यामुळे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक श्‍याम मानकर राष्ट्रवादीमधून, तर काही काळापूर्वी शिवसेनेत गेलेले सदानंद शेट्टी आता कॉंग्रेसमधून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.
काही प्रभागांत राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्यामुळे आणि सक्षम सहकाऱ्याच्या शोधात असलेले कॉंग्रेसचे नगरसेवक बंडू गायकवाड, अभिजित कदम, नगरसेविका शीतल सावंत, अश्‍विनी जाधव हे काय सध्याच्या परिस्थितीत काय करायचे, याचा विचार करीत आहेत. कॉंग्रेसच्या सुनीता गलांडे, सुनंदा गडाळे, राष्ट्रवादीचे पिंटू धाडवे, मनसेचे राजेश बराटे यांची पावले भाजपच्या दिशेने पडत आहेत, असे वाटत असले तरी त्याला "ब्रेक' लागला असून त्यांनी भूमिका अजून निश्‍चित केलेली नाही. मनसेचे शिवाजी गदादे, राहुल तुपेरे, राजू पवार, सुनीता साळुंखे, अर्चना कांबळे, अनिता डाखवे यांचाही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, यावर सध्या विचार सुरू आहे. राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांना भाजपकडून, तर मनसेचे बाबू वागस्कर, वनिता वागस्कर यांना भाजपकडून साद घालण्यात येत आहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक शंकर पवार तसेच रिना पवार, अनिल जाधव, राष्ट्रवादीचे आबा रासकर, मनसेचे नारायण गलांडे आता कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

"सीट रिझर्व्ह'ची तपासणी
"विद्यमान 25 नगरसेवक पक्ष प्रवेशासाठी संपर्कात आहेत', असे विधान करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी चर्चेचे रान उठविले, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही मोठ्या प्रमाणावर विद्यमान नगरसेवक, अन्य पक्षांतील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते येण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे त्या-त्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. काही प्रभागांत ऐनवेळी इतर पक्षातून येणाऱ्या प्रमुख इच्छुकांसाठी "सीट रिझर्व्ह' ठेवता येईल का, हेही तपासून बघितले जात आहे.

दिवाळीनंतरही फटके फुटणार?
इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू होणार आहे. दरम्यान 25 नोव्हेंबरला प्रभागरचना अंतिम होईल. या मधल्या काळात निवडणुकीची तारीख जाहीर होणार असल्यामुळे दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटण्यास पुन्हा एकदा प्रारंभ होईल, असे विविध राजकीय पक्षांमधील जाणकार सांगत आहेत.