राष्ट्रवादीच्या दबावतंत्रापुढे काँग्रेसची परीक्षा 

राष्ट्रवादीच्या दबावतंत्रापुढे काँग्रेसची परीक्षा 

पुणे राष्ट्रवादीचे की काँग्रेसचे यावर आता बरीच चर्चा होईल; पण यानिमित्ताने पुण्यात काँग्रेसची ताकद किती उरली, यापेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्याची जागा लढविण्याची इच्छा स्पष्टपणे पुढे आली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासूनच पुण्याची जागा पक्षाला हवी, याबाबत वेळोवेळी चर्चा झाली. अजित पवार बोलले हे खरे आहे, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढलीय आणि आमच्याकडे ताकदीचा उमेदवार आहे.

अर्थातच पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या साडेतीन जागेपैकी दोन जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. केवळ पुण्याची जागा काँग्रेसकडे असून काँग्रेस आघाडीच्या जागा वाटप सूत्रानुसार तिच्यावर काँग्रेसचाच हक्क आहे. 1952पासून नानासाहेब गोरे (1957), मोहन धारिया (1977), अण्णा जोशी (1991), प्रदीप रावत (1999) आणि अनिल शिरोळे (2014) या काँग्रेसेतर उमेदवारांचा अपवाद वगळता पुण्याची जागा काँग्रेसकडेच राहिली आहे.

2014 नंतर मात्र पुण्यातील काँग्रेसची परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकांचा विचार केला, तरीही शहरात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त दिसते, असे असले तरी पुण्याच्या जागेवरचा राष्ट्रवादीचा दावा हा दबावतंत्रासाठीचाच अधिक वाटतो. 

ऑक्‍टोबर 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतांचे आकडे पाहिले, तर पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी शिवाजीनगर, पुणे कॅंटोनेमेंट आणि कसबा पेठ या तीन मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. वडगावशेरीत आणि कोथरूडमध्ये पाचव्या, तर पर्वतीत काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या कामगिरीवर नजर टाकली, तर वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड आणि पर्वती या चार मतदारसंघांत पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. कसब्यात चौथ्या, तर पुणे कॅंटोन्मेंटमध्ये पाचव्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळाली होती. विधानसभेत राष्ट्रवादीला सहा मतदारसंघ मिळून एकूण 1 लाख 44 हजार मते मिळाली होती. हा आकडा एवढ्यासाठी की राष्ट्रवादी स्वतंत्रपणे या निवडणुकीत लढली होती. महापालिकेत काँग्रेसची स्थिती आणखी खालावली त्या तुलनेत राष्ट्रवादीला 40 जागांवर तग धरता आला, त्यामुळेच राष्ट्रवादीला पुण्यात काँग्रेसपेक्षा आपली ताकद जास्त आहे, असे वाटत आहे. 

राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केल्यानंतर खरे तर काँग्रेसमधून जोरदार प्रतिक्रियेची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गटातटात विभागलेला आणि भूमिकेबाबत ठाम नसलेल्या काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांनी "हायकमांड' म्हणतील तो निर्णय मान्य असेल, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसपुढे नांगी टाकली. त्याला कारणही तसेच आहे, गेल्या निवडणुकीत उमेदवार असणारे विश्‍वजित कदम आता सांगलीतून लढतील असा अंदाज आहे. 

इतर उमेदवारांच्या नावावर पक्षांतर्गत मतभेद आहेत. त्यातच काँग्रेसमधील काही नेते पुण्याच्या जागेच्या बदल्यात विधानसभेच्या काही जागा पदरात पडतात काय, याची चाचपणी करीत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर दावा केल्यानंतरही काँग्रेसचा आवाज क्षीण राहिला. 

हल्लाबोल यात्रेनिमित्त आत्मविश्‍वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या जागेवर केलेला दावा पुढे किती टिकेल हे माहिती नाही; पण या निमित्ताने काँग्रेसवर मात्र त्यांना आपला दबाव कायम ठेवणे शक्‍य होईल. आता या दबावतंत्राला बळी पडायचे की पक्षाची ताकद आहे हे सिद्ध करायचे हे मात्र काँग्रेसलाच ठरवावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com