ट्रेंड सकारात्मक पोस्टचा! 

मंगेश कोळपकर 
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पूल केवळ रस्त्यालाच जोडत नाही, तर आपल्या अमूल्य वेळेलाही जोडतो. विकासाचा विजय होणारच, कुस्तीत आपण नंबर 1 आहोतच; राजकीय आखाड्यातही नंबर 1 बनूया, संपूर्ण प्रभागाचा कायापालट, ...याला म्हणतात विकास, माझे मत विकासाला; माझे मत.... ला, यांसारख्या घोषणांच्या पोस्टने फेसबुकच्या वॉल सध्या बहरल्या आहेत. कारणही तसेच आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान असो अथवा इच्छुक, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी "सकारात्मक' पोस्टचा ट्रेंड सध्या बहरला आहे. 

नोटाबंदीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय असो, अथवा सहाराच्या कर्मचाऱ्याने लिहिलेली डायरी. आगामी अर्थसंकल्पाचे पडसाद किंवा कोणत्या साधूने (खासदार) केलेले वक्तव्य... हे झाले राष्ट्रीय स्तरावरील विषय. नोटाबंदीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने तीन-चार वेळा शहरात आंदोलनेही केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर पोस्टही टाकल्या. ते बघून मोदीसमर्थकही पेटले. त्यांनीही नोटाबंदीचे परिणाम आणि मेट्रोचे मार्केटिंग सुरू केले. त्याबाबतच्या पोस्टचा वर्षाव ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर सुरू झाला. मतदार नेटिझन मात्र, हे सगळं बघत होता. 

नेटिझनने प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला तो स्थानिक विषयांवर. कचरा व्यवस्थापन असो अथवा नव्याने उभारलेली नाट्यगृहे. बहुसंख्य नेटिझनने त्यावरच मत व्यक्त करण्यास सुरवात केली. तेव्हा कोठे स्थानिक विषयांचा समावेश असलेल्या पोस्ट अवतरू लागल्या. 

या पोस्टमध्येही थेट टीका, व्यक्तिगत टीका किंवा नकारात्मक संदेश असलेल्या पोस्टपेक्षा; विधायक, विकासकामांची दिशा दाखविणाऱ्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी विकासकामांची माहिती आणि महती देणाऱ्या चमचमीत घोषणाही सोशल मीडियावर झळकत आहेत. "प्रभागाच्या विकासाचा वायदा, हाच ... दादाचा वादा' असेही बघायला मिळत आहे. एकंदरीतच नकारात्मकतेपेक्षा पॉझिटिव्ह ट्रेंड सुरू झाल्याचे सोशल झालेल्या मीडियावर दिसत आहे.