स्थानिक प्रभाव,पक्षीय धोरणावर मदार

prabhag31
prabhag31

पुणे - नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभावक्षेत्र तुटले आहे. कर्वेनगरचा समावेश असणाऱ्या प्रभाग ३१ मध्येही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. शिवाय, या भागात झोपडपट्ट्या आणि मध्यमवर्गीय व उच्चभ्रू सोसायट्या अशा दोन्ही स्तरांवरील मतांचे एकत्रीकरण झाले आहे. त्यामुळे, स्थानिक प्रभाव आणि पक्षीय धोरणे अशा दोन्ही बाबींच्या आधारावरच मतदान होण्याची यंदा शक्‍यता आहे.

या प्रभागात अ गटातून भाजपतर्फे सुशील मेंगडे, मनसेतून राष्ट्रवादीची वाट धरत तिथली उमेदवारी पटकावलेले विनोद मोहिते, मनसेतर्फे उभे असणारे संजय नांगरे, शिवसेनेचे सचिन थोरात तसेच पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि तिकीट न मिळाल्याने आता अपक्ष उभे असणारे नीलेश निढाळकर हे प्रमुख उमेदवार असणार आहेत. आई शशिकला मेंगडे आणि वडील शिवराम मेंगडे यांचा राजकीय वारसा घेत सुशील यंदा मैदानात उतरले आहेत, तर गेल्यावेळी मनसेत असणारे मोहिते यंदा राष्ट्रवादीत गेले आहेत. या दोघांत या ठिकाणी तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.

ब गटातून राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, भाजपच्या रोहिणी भोसले, मनसेच्या मेधा आठाळे, शिवसेनेच्या दीपिका मोरे या उमेदवार असणार आहेत. अर्थात, अ गटातल्या प्रमाणेच ब गटातही बव्हंशी मुख्य लढत ही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात असण्याची परिस्थिती जाणवते.

क गटातून लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या रेश्‍मा बराटे, भाजपच्या वृषाली चौधरी, शिवसेनेच्या वैशाली दिघे, मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुरेखा मकवान, तसेच राष्ट्रवादीचे तिकीट न मिळाल्याने आपल्या हक्कासाठी अपक्ष लढत देणाऱ्या प्रभावी उमेदवार नीता शिंदे अशा सर्वांमध्येच मोठी चुरस असणार आहे. यांतील बहुतांश उमेदवार स्थानिक असल्यामुळे त्यांचा आपापला प्रभाव या प्रभागात पाहायला मिळेल.

मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले व आत्ताचे विद्यमान नगरसेवक राजेश बराटे, काँग्रेसचे अनुभवी व जाणते उमेदवार विजय खळदकर, मनसेचे कैलास दांगट, शिवसेनेचे मयूर वांजळे तसेच भाजपने उमेदवारी नाकारलेले बंडखोर अपक्ष उमेदवार वीरेश शितोळे यांच्यात ड गटातून तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.

या भागात झोपडपट्टी भागाच्या सोबतीलाच सोसायट्यांचाही समावेश झाला आहे. त्यात काही भाग पूर्वीच्या प्रभागाचा, तर काही भाग नव्यानेही जोडला गेला आहे. त्यामुळे, मतांची फेरमांडणी होण्याची शक्‍यता येथे मोठी आहे. दरम्यान, या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून तीन जागा राष्ट्रवादीला तर एक जागा काँग्रेसला मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com