भाजपने लोकशाहीचा गळा घोटला - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांनी एकत्र लढा उभारावा, असे मत भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पुणे - मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांनी एकत्र लढा उभारावा, असे मत भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये वापरलेल्या मतदान यंत्रांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप करीत भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शनिवारी शनिवारवाडा ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढला. या वेळी आंबेडकर बोलत होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, कॉंग्रेसचे तहसीन पूनावाला यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभय छाजेड, बाळासाहेब बोडके, दत्ता बहिरट, विकास दांगट, रूपाली पाटील, अस्मिता शिंदे आदी मोर्चात सहभागी झाले होते. निवडणुकीतील पराभूत उमेदवारही या वेळी उपस्थित होते. "ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा'च्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. 'माझे मत कोणी चोरले', "जितेंगे, लढेंगे, लढेंगे, जितेंगे', "ईव्हीएम हटवा, देश वाचवा,' अशा आशयाचे फलक घेतलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

आंबेडकर म्हणाले, 'राज्यातील महापालिका निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीवरून मतदान यंत्रांमध्ये गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजला निवडणुकीत यश मिळाले आहे. निवडणुकीच्या आधी भाजपने असे उद्योग केले आहेत. आता सत्ता ताब्यात घेतल्यानंतर केवळ मनमानी कारभार सुरू राहील. मतदान यंत्रातील फेरफारामुळे सर्व महापालिकांच्या निवडणुका पुन्हा झाल्या पाहिजेत. त्या "बॅलट पेपर'वर घ्याव्यात.'' मतदान यंत्रांबाबतचा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडण्या ऐवढा मोठा झाला पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसे-पाटील यांचेही या वेळी भाषण झाले.

Web Title: prakash ambedkar talking