प्रसारमाध्यमांनी देशातील बदल समजून घ्यावेत : जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

जावडेकर म्हणाले, "स्वच्छता, पर्यटन, शेती अशा सगळ्याच क्षेत्रात मोठा बदल होत आहे. हे बदल आपण समजून घेतो का, हा खरा प्रश्‍न आहे. जिथे चुकत असेल, तेथे वर्तमानपत्रांनी टीका केली पाहिजे; ते त्यांचे स्वातंत्र आहे. परंतु जे सकारात्मक होत आहे, त्यांची दखल घेतली गेली पाहिजे.''

पुणे : "देशात सर्वच क्षेत्रांत बदल घडत आहेत. ते आपण समजून घेतो की नाही, हा खरा प्रश्‍न आहे. तो समजून घेतला नाही, तर सर्वसामान्य जनता आणि तुमची नाळ तुटल्याशिवाय राहणार नाही,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांबाबत बोलताना व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित "कै. ज. स. करंदीकर' व्याख्यानात "बदलता भारत व प्रसारमाध्यमे' या विषयात जावडेकर बोलत होते. संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ""स्वच्छता, पर्यटन, शेती अशा सगळ्याच क्षेत्रात मोठा बदल होत आहे. हे बदल आपण समजून घेतो का, हा खरा प्रश्‍न आहे. जिथे चुकत असेल, तेथे वर्तमानपत्रांनी टीका केली पाहिजे; ते त्यांचे स्वातंत्र आहे. परंतु जे सकारात्मक होत आहे, त्यांची दखल घेतली गेली पाहिजे.''

देशात जो बदल होत आहे. त्याला नागरिकही प्रतिसाद देत आहेत. जात आणि धर्म यापुढे जाऊन त्यांना प्रगती हवी आहे. हे उत्तर प्रदेशाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लोकांना ती खात्री पटली आहे. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदींना पाहून मतदान होत आहे. हाच बदलता भारत आहे. हे समजून घेतले नाही, तर प्रसारमाध्यमे मागे पडतील, अशी भीती वाटते.'' सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे यांनी केले. प्रास्ताविक बडे यांनी केले, तर आभार सागर येवले यांनी मानले.