प्रसादावर "एफडीए'ची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

पुणे - गणेशोत्सवात सार्वजनिक आरतीनंतर देण्यात येणाऱ्या प्रसादावर "अन्न व औषधद्रव्य प्रशासना‘ची (एफडीए) "नजर‘ राहणार आहे. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

पुणे - गणेशोत्सवात सार्वजनिक आरतीनंतर देण्यात येणाऱ्या प्रसादावर "अन्न व औषधद्रव्य प्रशासना‘ची (एफडीए) "नजर‘ राहणार आहे. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते. दूषित प्रसादाच्या सेवनातून विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी "एफडीए‘ सतर्क झाले आहे. "एफडीए‘च्या पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई म्हणाले, ""गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्य पदार्थांची गुणवत्ता तपासावी. तसेच प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगणे आवश्‍यक आहे. रॉकेल, फिनेलसारखे द्रवपदार्थ प्रसाद करण्याच्या ठिकाणी नसावेत, तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवावा. त्यामुळे प्रसाद दूषित होण्याची शक्‍यता कमी होते.‘‘

प्रसादात शक्‍यतो कोरड्या पदार्थांचा समावेश असावा. प्रसादाबद्दल कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती मंडळांना पाठविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन पथके नियुक्त 

शहरातील प्रसादावर नजर ठेवण्यासाठी 22 अधिकाऱ्यांची तीन पथके नियुक्त केली आहेत. तीन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत केली आहेत. येरवडा, शिवाजीनगर, औंध-पाषाण, कर्वेनगर या भागासाठी एक, मार्केट यार्ड, कात्रज, धनकवडी, स्वारगेट, सहकारनगर यासाठी दुसरे तर, पिंपरी-चिंचवड भागात तिसरे पथक नियुक्त केले आहेत. तेथील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रसादाच्या स्वच्छतेबद्दल ते मार्गदर्शन करतील.

Web Title: Prasad, the "look FDA