आई-बाबा, तुम्ही नका खचून जाऊ !

आई-बाबा, तुम्ही नका खचून जाऊ !

पुणे - मोठ्या आजारपणात केवळ रुग्णच मानसिकदृष्ट्या खचतो, असे नव्हे तर संपूर्ण कुटुंब हवालदिल झालेले असते. सगळ्यांच्याच मनात खोलवर बोचणी लागलेली असते; पण या छोट्या प्रतीकने स्वत:लाच सावरले नाही, तर सर्जनात्मक कामामध्ये गुंतवून घेतले आणि आई-वडिलांनाही मानसिक आधार दिला. एवढ्याशा वयात ही परिपक्वता ! म्हणूनच त्याची कहाणी सर्वांना सांगण्यासारखी आहे.

‘हॉस्पिटल आणि कोर्ट’ कोणाच्याही वाट्याला येऊ नये, असे म्हणतात. दोन्ही अख्खे घर तणावात टाकणारे असते. त्यात दवाखाना पाठीशी लागणे खूपच वाईट. संपूर्ण परिवार तणावाखाली असतो. त्यात कुटुंबातील सदस्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होतो. कर्करोगासारखा आजार असेल, तर साऱ्या घरात तणावाचे वातावरण असते. संवाद कामापुरता चाललेला असतो. पुण्यातील निंबाळे कुटुंबाने तब्बल दोन वर्षे हा अनुभव घेतला आणि त्यांच्या बारा वर्षांच्या प्रतीकला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले; पण एवढ्यात वाईट दिवस संपतील तर ती नियती कसली....

दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात प्रतीकला खूप त्रास होऊ लागला. त्या वेळी तो सातवी इयत्तेत शिकत होता. सुरवातीचे काही महिने उपचार झाले; पण प्रकृती खालावत गेल्याने मोठ्या रुग्णालयात जाऊन तपासण्या केल्या असता त्याला हाडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि निंबाळे दांपत्याच्या मनावर प्रचंड आघात झाला. या आजारावरील उपचार खूपच खर्चिक असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघेही खूप खचले. ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हा उपचार करण्यासाठी पंधरा ते वीस लाखांपर्यंत खर्च येणार होता. दोघांचे उत्पन्न मिळून वीस हजारांच्या आतच. त्यामुळे एकुलत्या एक मुलावरचे उपचार कसे करायचे, या प्रश्‍नाने दोघांची चिंता वाढली. दोघांचा प्रेमविवाह असल्याने घरच्यांची साथ मिळालीच नाही, अशी प्रतीकच्या आईची खंत आहे.

प्रतीकच्या उपचाराचा खर्च उभा करण्यासाठी दोघांनी जिवाचे रान केले. वैद्यकीय मदत करणाऱ्या अनेक संस्थांना भेटी दिल्या, त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शिवाय, कर्जही काढावे लागले आणि ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ केले. त्यासाठी साडेएकोणीस लाख रुपये खर्च आला. प्रतीकला आजाराबद्दल काही सांगण्यात आले नव्हते; परंतु आई-बाबांची घालमेल पाहून त्याला अंदाज आला, थकलेल्या आई-बाबांना मग तोच आधार देऊ लागला. ‘मी निश्‍चित बरा होईन आणि माझ्या नशिबात असेल ते होईल; पण आई-बाबा, तुम्ही नका खचून जाऊ !’ त्याच्या या बोलीने उभयतांना केवढे बळ आले असेल. प्रतीक एवढ्यावरच थांबला नाही तर तो रांगोळी तयार करण्याच्या कामात आईला मदत करू लागला. आजाराशी झुंज देताना त्याने केलेले काम पाहून आई-बाबा हरखून जायचे.

‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी झाले, प्रतीकची प्रकृती सुधारू लागली. दहा किलोने कमी झालेले वजन चार किलोंनी वाढले; त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला, दोघेही हर्षभरित सांगतात; मात्र मध्येच थांबतात. प्रतीकच्या मानेतील एका शिरेमध्ये काही तरी अडकल्याचे एका चाचणीवेळी लक्षात आले. त्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया सुचवण्यात आली आहे. लाख-दीड लाखापेक्षा अधिक खर्च येणार आहे. त्यामुळे या कुटुंबाची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. आपल्या गुणी मुलासाठी आपण काहीही करू; पण शस्त्रक्रिया करूच. बस्स, आणखी काही दिवस. येत्या जूनमध्ये त्याला पुन्हा शाळेत  पाठवायचे आहे ना !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com