हल्ली विचारांची लढाई राहिलेली नाही: प्रवीण गायकवाड

अमित गोळवलकर: सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मी अजूनही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे. मात्र संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची नोंदणी वेगळी आहे. काहींना वाटले, की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारण केले तर यश येईल. पण मला तसे वाटत नाही...

पुणे - "संभाजी ब्रिगेड' संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह शांताराम कुंजीर, अजय भोसले, श्रीमंत कोकाटे यांनी आज (मंगळवार) येत्या 12 जानेवारीस होणाऱ्या जाहीर मेळाव्यात भारतीय शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) प्रवेश करण्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख व प्रा. एन डी पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

गायकवाड यांनी यावेळी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष व संघटना, शेती व शेतकरी, मराठा मोर्चा अशा विविध विषयांवरील भूमिका स्पष्ट केली. याचबरोबर, राजकीय कारकीर्द सुरु करण्यासाठी शेकापची निवड केल्याच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी आमदार विनायक मेटे यांनाही लक्ष्य केले.

गायकवाड म्हणाले -

* आता विचारांची लढाई रहिलेली नाही. आपले विचार विसरून अनेकजण प्रतिगामी पक्षांबरोबर जात आहे. आम्ही मात्र विचार सोडलेले नाहीत.

* शेती हा देशाचा कणा आहे; मात्र तोच मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वामीनाथन आयोग लागू करणार नाही, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री घेतात आणि कोणी त्याला विरोध करत नाही हे दुर्दैवी आहे.

* शेकाप या पक्षावर कुठलाही डाग नाहीत. अन्य सर्व पक्ष डागाळलेले आहेत. फक्त शेकापचा विचारच शेतकरी हिताचा आणि ब्राह्मणेतर विचारांचा आहे.

* संभाजी ब्रिगेड ही कार्यकर्ते घडविणारी संघटना आहे. मी अजूनही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे. मात्र संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची नोंदणी वेगळी आहे. काहींना वाटले, की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारण केले तर यश येईल. पण मला तसे वाटत नाही. शिवसेना भवन वरील पुतळ्याबाबतची भूमिका ही संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची आहे. संघटनेची नव्हे.

* मेटे हे विचारांशी एकनिष्ठ नाहीत. ते केवळ आमदारकी डोळ्यांसमोर ठेवून ते भूमिका घेतात.

* मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री फक्त निवेदने देतात. या सरकारने आता ठोस कार्यवाही करावयास हवी. मुंबईतील 31 जानेवारीच्या मोर्चाबबत मराठा समाजात फूट नाही.

यावेळी, शेकाप पुणे व पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल पोकळे यांनी केली. याचबरोबर शेकापमध्ये अन्य पक्षांमधून आलेल्यांनाही उमेदवारी दिली जाईल, असे पोकळे म्हणाले.