लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रेमवीराच्या हाती 'बेड्या'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पुणे - फेसबुकच्या माध्यमातून जुळलेले सूत मंगळसूत्रात बांधण्यासाठी तो परदेशातील बड्या पगाराची नोकरी सोडून पुण्यात आला, परंतु "तिचे‘ दुसऱ्याशीच लग्न ठरल्याचे समजल्याने त्यांच्यात वाद झाला आणि प्रेम प्रकरणाचा शेवट "त्याच्या‘ हातात बेड्या पडून झाला.

पुणे - फेसबुकच्या माध्यमातून जुळलेले सूत मंगळसूत्रात बांधण्यासाठी तो परदेशातील बड्या पगाराची नोकरी सोडून पुण्यात आला, परंतु "तिचे‘ दुसऱ्याशीच लग्न ठरल्याचे समजल्याने त्यांच्यात वाद झाला आणि प्रेम प्रकरणाचा शेवट "त्याच्या‘ हातात बेड्या पडून झाला.

एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे पुण्यातील डेक्कन परिसरात घडलेली ही घटना आहे. मूळ केरळ येथील आणि सध्या भोसरी येथे राहत असलेल्या "त्याचे‘ वय 25 असून, "तिचे‘ 23 वर्षे आहे. दोन वर्षापूर्वी तिची केरळमधील रहिवाशी असलेल्या आणि कतार येथे नोकरीस असलेल्या तरुणासोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांमध्ये लग्नाबाबत बोलणीही झाली. त्यामुळे एका खासगी कंपनीत मनुष्यबळ विकास विभागात असलेल्या नोकरीवर पाणी सोडून तोही प्रेयसीसाठी पुण्यात आला; परंतु पुण्यात आल्यानंतर मात्र त्याला वेगळ्याच गोष्टीची जाणीव झाली. तिची दुसऱ्यासोबत मैत्री झाल्याचे त्याला समजले. एवढेच नाही, तर तिने त्याच्याशी बोलणेही बंद केले. त्यामुळे प्रेमात सैरभैर झालेल्या आणि मनात लग्नाचे मांडे खात पुण्यात आल्यानंतर त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. रागाच्या भरातच तो डेक्कन भागात ती शिकत असलेल्या महाविद्यालयात तिला भेटण्यासाठी गेला. "असे का केलेस‘, अशी विचारणा करत तिला लग्नाची पुन्हा गळ घातली; परंतु माझे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याचे त्याला स्पष्टपणे सांगून ती तेथून चालू लागली. घरी जाण्यासाठी रिक्षात बसली असता तोही तिच्यासोबत रिक्षात बसला. पुन्हा लग्नाबाबत मनधरणी करू लागला; परंतु तिने काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पारा सरकलेल्या त्याचे तिच्याशी जोरदार खटके उडाले. त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच लग्न केले नाही तर घरच्यांचेही बरे वाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर घरी गेलेल्या युवतीने घडलेली घटना कुटुंबीयांच्या कानावर घातली. कुटुंबीयानी डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी त्याला अटक केली.