टायरच्या तापमानाची पातळी सांगणारे उपकरण तयार

अविनाश पोकळे
सोमवार, 8 मे 2017

"नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क या राष्ट्रीय मानांकन क्रमवारीत महाविद्यालय पुण्यात दुसरे, राज्यात सातवे आणि देशात 66 वे आले आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाचा उपयोग झाला आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विविध पातळीवर महाविद्यालय संशोधन करीत आहे.'' 
- प्रा. आनंद भालेराव, प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठ

पुणे - खूप वेळ वाहन चालवत असताना टायरचे तापमान वाढून ते फुटण्याची भीती अनेकदा वाटते. पण आता काळजी करू नका. आता या भीतीचं कारण राहणार नाही. टायरच्या तापमानाने धोकादायक पातळी ओलांडल्याची सूचना देणारे उपकरण भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील प्रा. राजेश घोंगडे यांनी विकसित केले आहे. 'टायर टेंपरेचर मॉनिटरिंग सिस्टिम' असे त्या उपकरणाचे नाव आहे. 

या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी विविध उपकरणे तयार केली आहेत. रस्त्यावरच्या अपघातांमध्ये जीवित हानीचा धोका कमी करणारे दुभाजक, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ नागरिक चालताना अचानक कोसळू शकतात; त्याबाबत त्यांच्या आप्तांना तत्काळ सूचना देणारे 'जीपीस ट्रॅकर', पारंपरिक चुलीद्वारे होणारे प्रदूषण कमी करून चुलीची कार्यक्षमता वाढविणारे तीन प्रकारचे 'बायोमास कूक-स्टोव्ह', आरोग्याला घातक असणारे पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करण्यासाठी वनस्पती संशोधनातून तयार केलेली 'फ्लुरॉईड रिमुव्हल सिस्टिम', हवेतील कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण कमी करणारे तंत्रज्ञान आदींचा यात समावेश आहे. 

टायरचे तापमान मोजणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविताना घोंगडे म्हणाले, "जास्त वेळ वाहन चालवत असताना टायरचे तापमान वाढते. त्यानंतर त्यातील हवेचा दाब वाढतो. त्यामुळे टायर फुटते. सर्वसाधारणत: 90 सेल्सियस तापमानावर टायर फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यासाठी वाहनाच्या टायरजवळील मेटल बॉडीवर उष्णतामापक यंत्र लावले जाते. हे यंत्र वायरलेस टेंपरेचर ऍपद्वारे आपल्या स्मार्ट फोनशी जोडले जाते. टायरचे तापमान 80 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक वाढल्यास ते स्मार्टफोनवर दिसून येते. त्यामुळे वाहनचालकाला वाहन थांबविणे शक्‍य होते आणि अपघात टळू शकतात.'' 

मेकॅनिक्‍स विभागातील विद्यार्थी जयदीप पाटील म्हणाला, "सिमेंट कॉंक्रिटच्या दुभाजकाचे वजन जास्त असते. त्यावर धडकल्यानंतर वाहनचालक, प्रवासी गंभीर जखमी होतात. त्यात मृत्यू होण्याची शक्‍यताही असते. हा धोका कमी करण्यासाठी सूक्ष्म फायबर, ग्लास फायबर, काथ्या, थर्माकोल, इपॉक्‍सी साहित्य, रबर वापरून 'कंपोझिट रोड डिव्हायडर' तयार केले आहे. या दुभाजकांना धडक बसल्यानंतर चालक किंवा प्रवाशांचे शरीर त्याला चिकटून बसत नाही. त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता कमी होते.'' 

"नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क या राष्ट्रीय मानांकन क्रमवारीत महाविद्यालय पुण्यात दुसरे, राज्यात सातवे आणि देशात 66 वे आले आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाचा उपयोग झाला आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विविध पातळीवर महाविद्यालय संशोधन करीत आहे.'' 
- प्रा. आनंद भालेराव, प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठ