बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुकांची मनधरणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीकरिता राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार देऊनही इच्छुकांनीही भरलेल्या अर्जांमुळे सर्वच पक्षांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. या इच्छुकांना रोखून बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. निवडणुकीत मतांची विभागणी होऊन विरोधकांचे पारडे जड होऊ नये, यासाठी इच्छुकांच्या मनधरणीची मोहीम राजकीय पक्षांनी उघडली आहे. पुढील दोन दिवसांत माघार घेण्यासाठी इच्छुक राजी होतील, अशी आशा या नेत्यांना आहे. 

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीकरिता राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार देऊनही इच्छुकांनीही भरलेल्या अर्जांमुळे सर्वच पक्षांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. या इच्छुकांना रोखून बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. निवडणुकीत मतांची विभागणी होऊन विरोधकांचे पारडे जड होऊ नये, यासाठी इच्छुकांच्या मनधरणीची मोहीम राजकीय पक्षांनी उघडली आहे. पुढील दोन दिवसांत माघार घेण्यासाठी इच्छुक राजी होतील, अशी आशा या नेत्यांना आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यात सर्वाधिक इच्छुक भाजपकडे होते. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा करीत, प्रत्येक प्रभागात एकाच पक्षातील अनेकांनी अर्ज भरले आहेत. त्यात भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने नाराज मंडळी आपला अर्ज कायम ठेवण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. विरोधकांचे आव्हान मोडीत काढण्याची रणनीती या पक्षांनी आखली असतानाच, पक्षांतील अन्य इच्छुकांच्या अर्जांची डोकेदुखी दूर करण्यासाठी पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण म्हणाल्या, ""अधिकृत उमेदवार असलेल्या प्रभागात अर्ज भरलेल्या इच्छुकांशी चर्चा केली जाईल. अर्ज मागे घेऊन अधिकृत उमेदवारांसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.'' 

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ""इच्छुकांनी भरलेले अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून आमदारही इच्छुकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे दोन दिवसांत इच्छुकांकडून अर्ज मागे घेतले जातील.'' 

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ""पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना माघार घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.'' 

शिवसेनेत ऐनवेळी आलेल्या चाळीसहून अधिक जणांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे काही प्रभागात बंडाचा पवित्रा घेतला आहे. पार्श्‍वभूमीवर इच्छुक शिवसैनिकांना शांत करण्याचे काम पक्षनेते करीत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, ""निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते बंडखोरी करणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'' 

इच्छुकांच्या संख्येचा आढावा घेण्याचा प्रयत्न 
भाजपमध्ये 50 हून अधिक, कॉंग्रेसमध्ये 60 हून अधिक तर, राष्ट्रवादीत 30 हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातच छाननीचे काम रविवारी रात्रीपर्यंत पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे नेमके किती इच्छुक अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू होता. 

Web Title: To prevent rebel candidates beseechingly