डेंगी रोखण्यासाठी खासगी डॉक्‍टरांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - शहरात डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून, महापालिकेने खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत पहिल्या टप्पात भारती हॉस्पिटलमधील सहा डॉक्‍टरांना मदतीसाठी बोलविण्यात आले आहे. साथीच्या आजार रोखण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी, पाहणी आणि उपाययोजना करण्यासाठी तेराशे जणांची नेमणूक केली आहे.  

शहरात गेल्या काही दिवसांत डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महापालिकेच्या सेवेतील काही डॉक्‍टरांनाही या आजारांची लागण झाल्याने ते रजेवर आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.  या पार्श्‍वभूमीवर खासगी रुणालयांतील डॉक्‍टरांची मदत घेण्याची सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला केली होती. महापालिकेकडे सध्या १८० डॉक्‍टर आहेत. मात्र, डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने या डॉक्‍टरांवर, यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आता भारती हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांची मदत घेण्यात आली असून, गरजेनुसार आणखी डॉक्‍टरांना बोलविण्यात येणार आहे. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील महिनाभर विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

डेंगी आणि चिकुनगुनिया या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. सध्या चिकुनगुनियाचे १ हजार ९००, तर डेंगीचे सातशे रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे महापालिका आणि काही खासगी डॉक्‍टर उपचारासाठी पुरेसे आहेत. 
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्य प्रमुख, महापालिका

Web Title: Private physicians to help prevent Dengue