प्रक्रिया प्रकल्पांचा ‘कचरा’

प्रक्रिया प्रकल्पांचा ‘कचरा’

हजार टन क्षमतेचे दोन प्रकल्प बंद; सातशे टन क्षमतेच्या प्रकल्पातून अडीचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया

पुणे - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेला सुमारे एक हजार टन क्षमतेचा हंजर आणि दिशा प्रकल्प सध्या बंद आहे, तर सातशे टनाच्या रोकेम प्रकल्पातून केवळ अडीचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.

परिणामी कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले हे प्रकल्प नावापुरतेच राहिले आहेत. आगीत जळालेला हंजर प्रकल्प तर ‘कचऱ्या’च्याच अवस्थेत आहे.
बायोगॅसनिर्मितीच्या उद्देशाने पाच टन क्षमतेचे २५ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यापैकी सात प्रकल्पांची मुदत संपली आहे. त्याबाबत विचारणा केली असता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल ८ कोटी ८८ लाख ७१ हजार रुपये खर्च केले आहेत. शहर आणि परिसरात रोज सुमारे १ हजार ६०० टन कचरा जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ हजार, सातशे, तीनशे आणि शंभर टन क्षमतेची सहा प्रकल्प उभारण्यात आली. त्यासाठी जवळपास २३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्यापैकी एक हजार क्षमतेचा हंजर प्रकल्प सन २००८ आणि दिशा २०१० पासून बंद आहे, तर रोकेम प्रकल्पात क्षमतेच्या तुलनेत निम्म्याहून कमी कचऱ्यावर प्रक्रिया होते.

शहर, उपनगरांतील कचरा कुंड्या ‘ओव्हरफ्लो’

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने शहरातील कचरा उचलणे थांबविण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून काही भागांमधील कचरा कुंड्या भरून वाहत असल्याचे दिसून आले. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी छोट्या प्रक्रिया प्रकल्पांवर कचरा नेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत.  

दरम्यान, कुंड्यांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत असून तो उचलला जात आहे. त्यासाठी साफसफाई कामगारांची नेमणूक केल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

शहरात दररोज सुमारे १ हजार ६०० टन कचरा जमा होतो. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे प्रमाण कमी असल्याने कुंड्यांमध्ये जास्त कचरा जमा होतो. तो फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोत नेला जातो. मात्र या डेपोला आग लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून कचरा वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे कुंड्यांमधील कचरा उचलला जात नाही. परिणामी, अनेक भागांमधील कुंड्या ‘ओव्हरफ्लो’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आगामी दिवसांमध्ये हा कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. आग आटोक्‍यात येण्यास आणखी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस डेपोत कचरा टाकला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने कचऱ्याचे नियोजन केले आहे. ज्या ठिकाणी कचरा जमा होतो, त्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. तो कमी क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही भागात कचरा साठून राहणार नाही. त्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असल्याचे घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.

कचरा डेपोची आग धुमसतेय

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोची क्षमता संपल्याने पुण्यातील कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. कचरा डेपोला शुक्रवारी लागलेली आग अद्याप आटोक्‍यात आली नसल्याने येथे टाकण्यात येणारा कचरा बंद केला आहे. 

महापालिका अडीच वर्षांपासून केवळ पाच एकरात कचरा टाकत असून, त्यामुळे कचऱ्याचे थर वाढल्याने सध्या लागलेली आग आटोक्‍यात आणणे कठीण बनले आहे. आगीचे स्वरूप पाहता आग पूर्णपणे विझविण्यासाठी आणखी आठवड्याचा कालावधी लागेल असा अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला आहे. तर आग आटोक्‍यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्ष कचरा डेपोच्या ठिकाणी आज ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता कचरा डेपोचा प्रश्‍न गंभीर असल्याचे दिसून आले. 

दुसरीकडे, कचरा टाकण्यास जागा नसतानाही केवळ मनमानी पद्धतीने पालिका कचरा टाकत असल्याचा आरोप फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी केला आहे. ‘अडचणीच्या काळात राज्य सरकार आणि महापालिका अनेक आश्‍वासने देते. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी करीत नाहीत,’ असेही त्यांनी म्हटले. वेगवेगळ्या यंत्रणांनी घेतलेल्या बैठका, त्यातील निर्णय आणि अंमलबजावणीचा कालावधी याची आठवणही ग्रामस्थांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर करून दिली. मात्र पालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी वस्तुस्थिती मांडत खुलासा केला. 

याबाबत जगताप म्हणाले, ‘‘सध्या कचरा टाकण्यास पाच एकर जागा आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून येथे कचरा टाकला आहे. ही जागा अपुरी पडत आहे. कचऱ्यात प्लॅस्टिकचा समावेश आहे. त्यामुळे कचरा पेट घेत आहे. मात्र अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून आग आटोक्‍यात आणली जात आहे.’’

परिसरात धुराचे लोट कायम
कचरा डेपोतील जवळपास अडीच ते तीन एकर जागेतील कचऱ्याला गुरुवारी पहाटे आग लागली. ती विझविण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही शुक्रवारी आग धुमसत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. परिणामी, ग्रामस्थ प्रचंड अस्वस्थ असून, शहरातून एकही गाडी डेपोत येऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच आग वाढू नये यासाठी पालिकेने येथे कचरा टाकणे बंद केले आहे. 

आगीची ठिकाणे शोधणे अवघड
जवळपास तीन एकर जागेतील कचऱ्याने पेट घेतल्याने ती आटोक्‍यात आणण्यासाठी किमान आठवडा ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही वेळा आग कमी होते, परंतु वाऱ्यामुळे ती पुन्हा पेट घेत आहे. तसेच जेथे आग आहे, ती ठिकाणे शोधताही येत नाहीत. धुरामुळे त्या ठिकाणांवर पोचणे शक्‍य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी पाचशे ते सहाशे टन कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये पाठविला जातो. त्यात ५० टन क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. तसेच दोनशे ते अडीचशे टन क्षमतेच्या प्रकल्पाचा उपयोग होत आहे. डेपोतील आग आटोक्‍यात आल्यानंतर सोमवारपासून पुन्हा डेपोत कचरा टाकला जाईल. 
- सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका

कचरा डेपोची स्थिती

१६३ एकर कचरा डेपोसाठी दिलेली जागा

४३+१६ एकर उरुळी देवाची

१०१ एकर फुरसुंगी

५ एकर सध्या कचरा टाकण्यासाठी उपलब्ध जागा

उर्वरित जागेची क्षमता संपली

यापूर्वीच्या आगीच्या घटना 

आगीची कारणे      वर्षे 
धूम्रपानामुळे    २०१२
पेटते टायर टाकल्याने    २०१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com