प्रचाराची रणधुमाळी शिगेला

प्रचाराची रणधुमाळी शिगेला

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. उद्या (शुक्रवारी) केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा होत आहेत. शनिवारी (ता. १८) भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होईल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा ‘रोड-शो’ १९ तारखेला होईल. 

उद्या (शुक्रवारी) शिवसेनेचे संपर्क नेते डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड-शो, तर शनिवारी पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात चार सभा होतील. 

राज्यातील काही जिल्हा परिषदा, तसेच उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे राज्यातील तसेच राष्ट्रीय नेते शहरात येऊ शकले नाहीत. मात्र, पुढील दोन दिवसांत आणखी काही नेते प्रचारासाठी येण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची तळवडे येथे चार वाजता सभा होणार आहे. तसेच, शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची रात्री आठ वाजता आकुर्डीतील विठ्ठल मंदिर चौकात सभा होणार आहे.  पालकमंत्री गिरीश बापटही वचननामा प्रकाशनासाठी शहरात येणार आहेत.   

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शुक्रवारी विशालनगर, पिंपळे निलख येथे सायंकाळी पाच वाजता सभा होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत व्यग्र होते, त्यामुळे त्यांची सभा शनिवारी किंवा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी होणार आहे. पवार यांच्या सभेची वेळ लवकरच निश्‍चित होईल असे राष्ट्रवादीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांची नियोजित १४ तारखेची सभा भोसरी येथे होणार होती; परंतु या सभेची वेळ दुपारची असल्यामुळे ती रद्द करण्यात आली. आता १८ तारखेला (शनिवारी) त्यांची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानावर होणार आहे. त्याचदिवशी धनंजय मुंडे यांच्या चार प्रचारसभा शहरात होणार आहेत.

भाजपकडून प्रचारासाठी मुख्यमंत्री वगळल्यास दुसरा कोणी नेता आतापर्यंत फिरकला नाही. त्यांच्या स्टार प्रचारकांच्या आणखी सभा, रोड-शोची आवश्‍यकता आहे. बुधवारची शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचीही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी पिंपरी- चिंचवडकडे आतापर्यंत पाठ फिरविल्याचे दिसत होते; मात्र अखेरच्या दोन दिवसांत अनेक सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com