प्रचार गीतेही ‘झिंग झिंग झिंगाट’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - ‘झेंडा भल्या कामाचा, जो घेऊनी निघाला...तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...पर्वाबी कुणाची’...‘लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान...सारे जग में कहीं नहीं दुसरा हिंदुस्तान’....‘झिंग झिंग झिंगाट...’ अशा गाण्यांच्या चालींवर तयार केलेली प्रचार गीते सध्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत. 

पुणे - ‘झेंडा भल्या कामाचा, जो घेऊनी निघाला...तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...पर्वाबी कुणाची’...‘लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान...सारे जग में कहीं नहीं दुसरा हिंदुस्तान’....‘झिंग झिंग झिंगाट...’ अशा गाण्यांच्या चालींवर तयार केलेली प्रचार गीते सध्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत. 

काहीतरी हटके आणि वेगळा प्रचार करण्यासाठी या गाण्यांच्या चालीवर तयार केलेल्या खास ‘रिंगटोन’ मतदारांच्या मोबाईलवर वाजत आहेत. वेगळ्या धाटणीने आपण मतदारांपर्यंत पोचावे, यासाठी उमेदवारांनी खास रिंगटोन तयार करून घेतल्या असून, त्यानुसार तयार केलेली प्रचार गीते फेमस होत आहेत. त्यात प्रचारासाठी विशिष्ट चालीत ही गाणी तयार करण्यात आल्याने प्रचाराचा हा फंडा लक्षवेधी ठरत आहेत.

 प्रत्येक प्रभागात खास प्रचार गीते वाजत आहेत. तसेच गाण्यांच्या चालीवर तयार केलेल्या खास ‘रिंगटोन’ मतदारांच्या मोबाईलवर वाजत आहेत. विशेष म्हणजे मतदान करा, मतदान कसे करावे, मत कोणालाही विकू नका, असा संदेशही गाण्यातून देण्यात येत आहे. 

‘गोष्ट आहे विकासकामाची, ऐकून घ्या ध्यान देऊनी, जाऊन सांगा घरोघरी’ असे आवाहन गाण्यातून केले जात आहे. गाण्याच्या शेवटी मात्र ‘मला मत द्या आणि बदल पाहा’, हे वाक्‍य न विसरता सर्वच उमेदवार मतदारांना सांगत आहेत. विविध गाण्यांच्या शब्दांचे स्वरूप जरी बदलले असले तरीही, आकर्षक चालींचा वापर करण्यात आला आहे. उमेदवार स्वत:चा प्रचार करण्याबरोबर स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, पर्यावरण संवर्धन या विषयीदेखील जागृती घडवून आणण्याचे काम गाण्यांमधून करत आहेत. एका पक्षाने स्वच्छ व पारदर्शक कारभाराची ग्वाही देताना ‘झिंगाट’ या गाण्याचा आधार घेऊन प्रचाराची धून असलेल्या सीडीचे प्रकाशन नुकतेच केले आहे. 

मूळ गाण्याच्या चालीवर तयार केलेली गाणी  
 मूळ गीत : भुईला या मेघुटांचं दान..चहूंकडं बहरलं रान...पाटामदी झुळुझुळु पाणी...पाखरांच्या चोचींतली गाणी. 
 या गाण्याची चाल वापरून केलेले गाणं : विकासाची गंगा प्रभागात....वाहणारी दिनरात....बहुजनांची सात.. विकासाच्या संग...

सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही स्वत:वर आणि पक्षावर आधारित नावीन्यपूर्ण गाणी बनवून घेत आहेत. आतापर्यंत आम्ही १५ उमेदवारांच्या मागणीनुसार गाणी तयार करून दिली आहेत. एक ते पाच मिनिटांपर्यंतची गाणी तयार करण्यासाठी तीन हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
- योगेश कांबळे
 

मावळे लागले कामाला हो जीऽ जीऽऽ
‘निवडणुकीच्या युद्धाचा सुरू हाय जागर...चारी बाजूंनी करूया जागे मतदार...व्हॉट्‌सॲप अन्‌ फेसबुकवर पोस्टचा करू वापर...विकासकामांचा प्रचार आता करू आरपार... मावळे लागले हो कामाला जीऽ जीऽऽ जीऽऽऽ’ अशा शाहिरांची ललकारी मतदारांच्या कानावर येत आहे. या आकर्षक पोवाड्यातून उमेदवार मतदारांना विकासकामांची व स्वतःची माहिती देत गंभीर प्रश्नांकडेही लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: promotions songs