'...लाज वाटते' वक्तव्याचा महापालिकेत निषेध 

'...लाज वाटते' वक्तव्याचा महापालिकेत निषेध 

पुणे - "जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या शहराची लाज वाटते...' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कथित वक्तव्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी एकत्र येत सोमवारी निषेध केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. या वेळी सभागृहात विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकाकी पाडले. 

सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाल्यावर भाजप सदस्यांनी चव्हाण यांचे वक्तव्य आणि महापौर प्रशांत जगताप बसप्रवास करताना महिलांच्या आरक्षित जागेवर बसले, त्याचा फ्लेक्‍स फडवून निषेध केला. या वेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा ठराव मांडला. त्या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षांच्या सदस्यांनी चव्हाण, महापौरांवर टीका केली. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ""सत्तेची सर्व पदे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असूनही त्यांना काही करता आले नाही. कोथरूडचा कचरा डेपो चव्हाण यांच्या कार्यकाळातच हडपसरला हलविण्यात आला. शहरातून सर्व पदे घ्यायची आणि शहरावरच टीका करायची, ही भूमिका योग्य नाही. आम्हाला पुण्याचा अभिमान आहे, तो कायम राहणारच आहे.'' 

भाजपचे गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ""राज्यसभेचे सदस्य असलेल्या प्रकाश जावडेकर यांनी जायकाच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी पुण्यासाठी आणला. त्याच सभागृहाच्या सदस्य असलेल्या चव्हाण यांनी शहरासाठी काय योगदान दिले?'' महापौर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून पुणेकरांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुभाष जगताप यांनीही चव्हाण यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार म्हणून चव्हाण यांनी केलेल्या कामांचा लेखाजोगा पुणेकरांसमोर मांडावा, असे आवाहन केले; तसेच परदेशातील परिस्थितीची पुण्याशी तुलना होऊ शकत नाही, "लाज वाटते' असे वक्तव्य म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अपमान आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, मनसेचे वसंत मोरे, रूपाली पाटील, वनिता वागस्कर, भाजपचे अशोक येनपुरे, मंजूषा नागपुरे, मनीषा घाटे यांनीही चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करून महापौरांच्या बसप्रवासाच्या घटनेवर टीका केली. सभा तहकूब करण्याचा ठराव 31 विरुद्ध 21 मतांनी मंजूर झाला. 
 

महापौर, चव्हाण यांच्यासाठी बचावाचा प्रयत्न 
महापौर जगताप, खासदार चव्हाण यांच्यावर भाजप, कॉंग्रेस, मनसे, शिवसेनेचे सदस्य टीका करीत असताना राष्ट्रवादीकडून सभागृह नेते बंडू केमसे, नंदा लोणकर, वैशाली बनकर, सुरेखा कवडे यांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. लोणकर म्हणाल्या, ""शहराची नाही तर, साठलेल्या कचऱ्याची लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटते, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे. त्याबाबत हेतूतः दिशाभूल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापौरांनाही राजकीय हेतूने लक्ष्य केले जात आहे. कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी चव्हाण आग्रही आहेत. ही समस्या नागरिकांची असून, त्यांच्यासाठीच त्या झटत आहेत.'' स्टंटबाजीचा जनक भाजप आहे. कचऱ्याबाबत चव्हाण जे काही बोलल्या आहेत, ती वस्तुस्थिती असून, कचऱ्याची समस्या दूर व्हावी, हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे केमसे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com