ronu-mujumdar
ronu-mujumdar

बासरीच्या सुरांसोबत उलगडले संगीताचे मर्म 

वेणूचे अंतर्मुख करणारे स्वर व तेवढीच रसपूर्ण चर्चा यांचा मेळ साधलेली ती कार्यशाळा. पं. रोणू मुजुमदार हे संगीत क्षेत्रातील विद्यार्थी व श्रोत्यांना बासरी वादनाचे तंत्र, बंदिशींमधील सौंदर्यस्थळे आणि मैहर घराण्याबाबत सविस्तर सांगत होते. चित्रपट संगीतात स्वत: केलेल्या बासरीवादनातील प्रयोगांचे रंजक अनुभवही मनमोकळेपणाने त्यांनी मांडले. भारती विद्यापीठाच्या अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसतर्फे आयोजित कार्यशाळेत त्यांनी गायन करीत, स्वत:च्या साधनेचे सारच जणू खुले केले. 

मैहर घराण्यातील गतकारी, लयकारी असा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग बासरीसाठी कसा उपयुक्त ठरला, ते रोणूदांनी सांगितले. स्वर, लय, भाव यानंतर साहित्य (शब्द) असा क्रम कलावंतांनी लक्षात घ्यावा. यासाठी त्यांनी काफी थाटातील "होरी खेलत नंदलाल बिरज में' ही शृंगारप्रधान ठुमरी गाऊन दाखविली. केवळ तंत्रात अडकल्यामुळे एखादी तान निर्जीव कशी होते, पण तिच्यात भाव ओतल्यास ती सजीव कशी होते, ते विभास रागातील रचनेच्या उदाहरणातून रोणूदांनी खुलविले. मारव्यातील आर्तता व्यक्त करणाऱ्या रिषभाची आळवणी ते बासरीवर करीत असलेले ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. भैरवासारख्या आदिरागातील मध्यसप्तकात केलेला मिंडेचा वापर त्यांनी दाखवताच उत्कटतेचा प्रत्यय आला. पं. रविशंकर यांनी निर्मिलेल्या तिलकश्‍याम रागातील गत वाजवून त्यांनी गायकी अंगाचे वैविध्य बासरीतून प्रभावीपणे दाखविले. 

प्रत्येक पिढीतील नवे कलाकार साधनेच्या बळावर आधीच्या परंपरेत मोलाची भर घालत असतात, असे रोणूदा म्हणाले. शास्त्रीय गायक-वादक कलावंतांनी आपल्या क्षमतेइतपतच रागविस्तार करावा. उगीच ओढून ताणून विस्तार केल्यास राग गुदमरतो व रुसतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी सादरीकरणासंदर्भात दिला. प्रश्नोत्तरांसह रंगलेल्या या कार्यशाळेत रोणूदांना प्रात्यक्षिकांसाठी शिष्य कल्पेश साचला यांनी बासरीवर व अनिरुद्ध देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली. विभागप्रमुख शारंगधर साठे यांनी प्रास्ताविक केले. 
- नीला शर्मा 
 

""तंत्रावर हुकूमत मिळवून नंतर ते विसरून जावे. वाद्य कुठलेही असो, त्याची ताकद व मर्यादाही समजावून घेऊन मेहनत केल्यास उत्तम परिणाम साधता येतो. गायकी अंग किंवा गायकीप्रधान नसलेली शैली असा भेद हा निव्वळ गैरसमज आहे. जे-जे वाजविलेले कानांना गोड लागते, ते गायकी अंगच असते.'' 
- पं. रोणू मुजुमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com