आणि काऊंटिंग झालं सुरू...

स्वप्निल जोगी - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पहिल्या फेरीअखेर शहरात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे उमेदवार आघाडीवर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, 'नोटा'चा वापर देखील अनेक मतदारांनी केल्याचे दिसून आले

पुणे - गेले दोन महिने सुरू असणारा पालिकेचा रणसंग्राम दोन दिवसांपूर्वीच विसावल्यानंतर आणि प्रत्येकच पक्षाच्या 'आमच्यासारखे आम्हीच' असं उच्चरवाने म्हणणाऱ्या उमेदवारांचे भविष्य अखेरीस मतपेटीत बंद झाल्यानंतर, आज (गुरुवार) सकाळी तो बहुप्रतिक्षित असा 'काऊंटिंग'चा दिवस उजाडला. शहरातील 41 प्रभागांसाठी 14 ठिकाणी मतमोजणी सुरू झाली...

सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीसाठी नऊ वाजेपासूनच सर्वपक्षीय उमेदवार आणि त्यांच्यासोबत असणारे मतमोजणी प्रतिनिधी केंद्रांवर हजर झाले होते. निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस असे सारेही ठिकठिकाणच्या केंद्रांवर सज्ज होते. मनांत बऱ्याचशा प्रमाणात धाकधूक, काहीसं टेन्शन आणि चेहऱ्यावर उत्सुकता असणाऱ्या उमेदवारांची लगबग देखील जाणवून येत होती.

आवश्यक त्या प्रशासकीय सूचना दिल्यानंतर अधिकाऱ्यांच्या घोषणेनुसार मतमोजणी सुरू झाली. काही केंद्रांवर मात्र प्रत्यक्ष मतमोजणी दहा वाजता सुरू होऊ शकली नाही. तेथे अर्धा ते पाऊण तासाने मोजणी सुरू झाली. मतमोजणीची सुरवात टपाल मतदान मोजणीने झाली.

मतपेट्या अन मतदान यंत्रांची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे 14 ते 22 टेबलवर करण्यात आली होती. सर्वांना बसण्यासाठी मंडप देखील घालण्यात आला होता. शिवाय, ऍम्ब्युलन्स आणि फायरगाडी यांची व्यवस्थाही काही ठिकाणी होती.

अनेक ठिकाणी महत्त्वाची नावं पिछाडीवर पाहायला मिळाली, तर कित्येक नावं अपेक्षेप्रमाणे आघाडी टिकवून होती. पहिल्या फेरीअखेर शहरात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे उमेदवार आघाडीवर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, 'नोटा'चा वापर देखील अनेक मतदारांनी केल्याचे दिसून आले.

पोलिसांची 'मोबाईल' अरेरावी !

मतमोजणीच्या ठिकाणी पत्रकारांना मोबाईल नेण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली असतानाही अनेक केंद्रांवर पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना अरेरावी करत हटकले. मोबाईल घेऊन केंद्राच्या आवारात प्रवेश करू दिला नाही. अनेक ठिकाणी पोलीस आणि निवडणूक कर्मचारी यांच्यातच पुरेसा समन्वय नव्हता. अखेरीस, पत्रकारांना मोबाईल आवश्यक असल्याचे खुद्द निवडणूक अधिकाऱ्यांनीच सांगितल्यावर पोलिसांना पर्याय उरला नाही आणि त्यांनी मोबाईलसह पत्रकारांना आत सोडले.

दुकानं चालू, लोकं मात्र हाकलले

मतदानमोजणी सुरू होण्याआधी मतदान केंद्रांजवळील रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर असणाऱ्या दुकानदारांची यामुळे पंचाईत झाली. अचानक पोलीस आले आणि त्यांनी दुकानांवरील ग्राहकांना तिथून जाण्यास फर्मावले. आसपास गर्दी नसावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
 

पहिली फेरी- भाजप पॅनल आघाडीवर

प्र 13 (एरंडवणा-हॅपी कॉलनी) मध्ये पहिल्या फेरीअखेर भाजपचे संपूर्ण पॅनल आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. चारही गटांतील उमेदवार इतर पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत मोठ्या आघाडीने पुढे होते. भाजपच्या उमेदवारांना जिथे तीनशे ते चारशे मतं मिळत होती, त्या केंद्रांवर इतरांना शंभराचा आकडाही पार करणे कठीण गेल्याचे चित्र होते.