"इक्विसॅट' प्रक्षेपणात आनंदचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - अमेरिकेतील दि नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन'ने (नासा) व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व पुण्याच्या आनंद ललवाणी या 22 वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेला उपग्रह आणि त्याचे नासाने केलेले प्रक्षेपण या प्रकल्पातील गटाचे नेतृत्व केलेला तो पहिला भारतीय विद्यार्थी ठरला आहे. 

या उपग्रहाच्या निर्मितीत आनंदने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये "इंजिनिअरिंग फिजिक्‍स' विषयात पदवी घेतली आहे. एरोनॉटिक्‍समधील आवड लक्षात घेत ब्राऊन युनिव्हर्सिटीतील ब्राऊन स्पेस इंजिनिअरिंगच्या संघात त्याची निवड करण्यात आली. "इक्विसॅट' प्रकल्पासाठी एकूण पाच गट कार्यरत होते. त्यातील 17 विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व आनंदकडे होते. त्याच्या गटाने मुख्यत: सौरऊर्जा आणि बॅटरीनिर्मितीचे काम पाहिले. आनंद सध्या ब्राऊन युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत आहे. आगामी काळात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठामधून "सोलर एनर्जी' विषयात "पीएच.डी.'चे शिक्षण घ्यायचे आहे. "एरोनॉटिक्‍स' विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने नासाने क्‍यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह या विद्यार्थिभिमुख उपक्रमाला सुरवात केली आहे. या अंतर्गत अमेरिकेतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याची संधी देण्यात येते. 

इक्विसॅटची निर्मिती करताना अडचणीचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करून विद्यार्थ्यांच्या गटाने उपग्रहाची निर्मिती केली. उपग्रहाच्या निर्मितीत अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यावर भर दिला आहे. उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे सौरऊर्जेवर चालणारे एलईडी बसविले आहेत. अवकाशातून हा उपग्रह पाहणे आणि त्याची जागा निश्‍चित करणे शक्‍य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना जागा निश्‍चित करण्यासाठी होऊ शकेल. 
- आनंद ललवाणी, विद्यार्थी 

असा आहे "इक्विसॅट' उपग्रह : 
एका गिफ्ट बॉक्‍स इतक्‍याच म्हणजे जवळपास चार इंचाचा हा उपग्रह आहे. नासाच्या "क्‍यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह' अंतर्गत ब्राऊन स्पेस इंजिनिअरिंग (बीएसई) गटाने त्याची निर्मिती केली. उपग्रहाचे प्रक्षेपण 20 मे या दिवशी करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून ब्राऊन युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी त्यावर काम करत होते. विशेष म्हणजे एखाद्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी किमान पन्नास हजार ते एक लाख डॉलर्स इतका खर्च येतो. मात्र या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह केवळ चार हजार डॉलर्समध्ये विकसित केला आहे. 

Web Title: Pune boy leads team to design satellite EQUiSat for NASA