भेसळयुक्त मिठाईवर "वॉच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

ग्राहकांनीही शहरातील परवानाधारक व अधिकृत मिठाई विक्रेत्यांकडून खरेदी करावी. मिठाई हा नाशवंत माल असल्याने खरेदीनंतर त्याचे लगेच सेवन करावे. खूप दिवस ते साठवून ठेवू नये. भेसळयुक्त माल बाजारपेठेत येणार नाही, यासाठी तपासणी सत्र सुरू केले आहे. खाद्य तेल, साजूक तूप, मिठाई या मागणी असलेल्या पदार्थांचे आवश्‍यक तेथे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. 

- शिवाजी देसाई, सहआयुक्त, एफडीए (अन्न), पुणे विभाग. 

पुणे - दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात येणारी भेसळयुक्त मिठाई, वनस्पती तुपाचे मोठे साठे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) हाती लागत आहेत. गुजरातमधून येणाऱ्या स्पेशल बर्फीबरोबरच वनस्पती तुपाचा लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे. त्यामुळे भेसळयुक्त माल बाजारात आणण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर "एफडीए‘ने गुप्तचर यंत्रणा सक्रिय केली असून, त्यामुळे एका दिवसामध्ये भेसळीच्या संशयावरून साडेचार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यात वनस्पती तुपासह, बटर, पनीर, गायीचे आणि म्हशीचे तूप जप्त केले आहे. 

या बाबत अधिक माहिती देताना "एफडीए‘चे सहायक आयुक्त संजय शिंदे म्हणाले, ""मार्केट यार्डमध्ये भेसळयुक्त वनस्पती तूप विक्री होत असल्याचे समजताच तेथे छापा टाकून एक हजार 658 किलो माल जप्त केला आहे. त्याची बाजारातील किंमत एक लाख 41 हजार रुपये आहे. पनीर, बटर, गायीचे आणि म्हशीच्या तुपातही भेसळीची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी बुधवार पेठेतील वेगवेगळ्या डेअऱ्यांवर रविवारी छापे टाकले. त्यातून तीन लाख दहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.‘‘ 

या सर्व पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर या मालाच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मिठाई तयार करण्यासाठी अत्यावश्‍यक असलेल्या खव्याची मागणी वाढत आहे. गुजरातवरून अत्यंत अस्वच्छ अवस्थेत येणाऱ्या खव्याचा व्यापार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हजारो किलो मिठाईचा खवा पुण्यात अहमदाबादेतून येत होता. पोत्यात गुंडाळून बसच्या टपावर टाकून आलेला हा खवा पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीला जाण्यापूर्वी जप्त करण्यात आला, असेही शिंदे यांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, विजय उनवणे, प्रशांत गुंजाळ, धनश्री निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

ही काळजी घ्या 

- उघड्यावरचे, सुटे अन्न पदार्थ घेऊ नका 

- अधिकृत विक्रेते आणि परवानाधारकांकडूनच खरेदी करा 

- खरेदीचे बिल आठवणीने घ्या 

चोवीस तासांतील जप्त केलेला माल (रुपयांमध्ये) 

- वनस्पती तूप ......... एक लाख 41 हजार 

- पनीर .................. 39 हजार 840 

- गायी व म्हशीचे तूप ... 17 हजार 680 

- बटर ..................... 63 हजार 680 

- खवा ..................... 1 लाख 89 हजार