पुणेकरांचा जाहीरनामा साकारणार

pmc-declaration
pmc-declaration

महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष जाहीरनामे तयार करतात. नागरिकांच्या मनातील विकासाची संकल्पना प्रत्यक्षात यावी, यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला, त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि साकारला गेला ‘पुणेकरांचा जाहीरनामा’. त्याची दखल घेण्याची ग्वाही सर्वच राजकीय पक्षांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर एकत्रित दिली. पक्ष शहरविकासासाठी आगामी काळात कोणती भूमिका घेणार, याचा हा आढावा. 

ॲड. वंदना चव्हाण (शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) : शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार नियोजन करणार आहोत. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रकल्प उभारले पाहिजेत. खासगी वाहने कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात, ‘पीएमपी’ सेवा सक्षम व्हावी आणि महिलांसाठी ‘पीएमपी’मध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी आमचा भर असेल. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प उभारले जातील. घरांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देऊ. ‘स्टार्ट अप’ला प्राधान्य राहणार असून, ‘बीओटी’ तत्त्वावर ‘इन्क्‍युबेशन सेंटर’ सुरू करण्याचा प्रयत्न राहील. शहरांतर्गत व्यापाराला चालना देण्याचा प्रयत्न असेल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. सर्वत्र महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन आहे. २४ तास पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यावर आणि नव्या जलवाहिन्यांचे जाळे वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ठराविक लोकसंख्येला मोकळी मैदाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. गरिबांना विशेषतः झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना माफक दरात आरोग्यसेवा पुरविणाऱ्या योजना राबविण्यात येतील.

रमेश बागवे (शहराध्यक्ष, काँग्रेस) ःशहराच्या वर्दळीच्या मुख्यतः मध्यवर्ती भागात ‘शटल बससेवा’ सुरू करून वाहतूक सुरळीत करता यईल, त्यादृष्टीने ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न राहील. वर्तुळाकार रस्त्यांचे (एचसीएमटीआर) काम मार्गी लावणार असून, वारजे ते खराडी (नदीकाठालगतचा) रस्ता करण्याकडे लक्ष दिले जाईल. ‘बीआरटी’ सेवा सक्षम करून तिची व्याप्ती वाढविण्याच्या हालचाली करण्याचा प्रयत्न असेल. ‘एसआरए’ योजनेची अंमलबजावणी करून तेथील रहिवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येतील. कचऱ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जुने प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करू. तसेच, मोठ्या क्षमतेच्या नव्या प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. ‘स्टार्ट अप’ला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जाणार असून, उद्योगाला चालना देताना त्या त्या भागातील ग्राहकांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यात येतील. बाजारपेठांमधील वाहनांसाठी स्वतंत्र टर्मिनल करू. ज्येष्ठ नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढविण्याचा प्रयत्न असेल. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल. पाणीपुरवठा व्यवस्थेत नवे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला जाईल. महापालिकेची सर्व रुग्णालये सक्षम करून रुग्णांना माफक दरात औषधे उपलब्ध होतील, अशी योजना राबविण्यात येईल. 

योगेश गोगावले (शहराध्यक्ष, भाजप) ः केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. शहरविकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात योजनांची आखणी केली आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध उपक्रम पक्षातर्फे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच, शहराला भेडसावणाऱ्या समस्या कशा पद्धतीने सोडविता येतील, हेही नागरिकांपर्यंत पोचविण्यात येईल. शहराचा विचार करताना लगतच्या गावांमध्येही सुधारणा होतील, याकडेही लक्ष दिले जाईल. विकासाची प्रक्रिया ही सर्वसामान्यांच्या दरवाजापर्यंत पोचविण्यासाठी सक्षम नियोजन करावे लागणार आहे. कारण, शहरातील प्रत्येक प्रभागाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात घेऊन भाजपतर्फे ४१ प्रभागांचे स्वतंत्र जाहीरनामे तयार करणार आहे. तसेच, संपूर्ण शहराचा जाहीरनामा तयार करताना त्याचा प्राथमिक आराखडा १५ डिसेंबरच्या सुमारास प्रसिद्ध करून, त्यावर नागरिकांचे मत घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने अंतिम जाहीरनामा तयार करण्यात येईल. प्रत्येक प्रभागात एक योग केंद्र असो, अथवा ॲमिनिटी स्पेसचा वापर हा उद्योग केंद्र किंवा महिलांसाठीच्या उपक्रमांसाठी करता येईल का, पाणीपुरवठ्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, वाहतूक समस्या सोडविणे आदींबद्दलची उत्तरे भाजच्या जाहीरनाम्यात नागरिकांना मिळतील.

हेमंत संभूस (शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) ः ‘पीएमपी’ बसमार्गांचे सुसूत्रीकरण करताना बसमार्गांचे टप्पे करण्याचे नियोजन केले पाहिजे, त्यासाठी सातत्याने प्रयत्न असतील. शहरांतर्गत वर्तुळाकार (एचसीएमटीआर) रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावला जाईल, जेणेकरून वाहतूक समस्या सोडवण्यास मदत होईल. कचऱ्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यावर भर राहणार असून, त्यावरील प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढवून त्याचे योग्य नियोजन केले जाईल. प्रभागांमध्ये कचरा जिरविण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांची व्याप्ती वाढवू. नागरिकांना मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात, प्रामुख्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीकाठी मैदाने निर्माण करता येतील का, याचा विचार गांभीर्याने करू. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना चांगली घरे देतानाच, त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष राहील. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नेमक्‍या योजना राबविण्यात येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com