पूररेषेच्या बाहेर असूनही रस्ता उखडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

महापालिकेचा अजब कारभार; सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

धायरी - सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता उखडण्याचे काम महापालिका करत आहे. वास्तविक विठ्ठलवाडी वारजे नदीकाठचा रस्त्याचा जो भाग पूररेषेत येतो, तेवढा भाग काढून टाकावा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने पुणे महापालिकेस दिला आहे; मात्र पूररेषेच्या बाहेर असलेला आणि परिसरातील नागरिकांना एकमेव असलेला रस्ता उखडला जात आहे. 

पुणे महापालिकेच्या अजब कारभारामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सन प्लॅनेट येथील रहिवाली त्रस्त झाले आहेत. या रस्त्याला सन प्लॅनेट, सोहम रिव्हेरिया यासारखे मोठे गृहप्रकल्प असून, येथे किमान दीड-दोन हजार नागरिक राहतात. तसेच हाच रस्ता वहिवाट असल्याचे त्यांना दिलेल्या कागदपत्रात नमूददेखील केले आहे. 

प्रत्यक्षात रस्त्याला लाल आणि निळ्या पूररेषेची (रेड अँड ब्ल्यू लाइन) खांब रोवून जागेवर आखणी करण्यात आली आहे. लाल पूररेषेपासून सुमारे साडेतीन ते चार फूट रस्ता अलीकडे आहेत. असे असतानादेखील महापालिका हा रस्ता उखडू पाहत आहेत. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून, महापालिका ‘वड्याचे तेल वांग्यावर काढत आहे’ असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 

तसेच हा रस्ता काढा म्हणून कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. न्यायालयाने या भागातील रस्ता रद्द केला नसून, तो पुलासारखा ‘इलेव्हेटेड’ बांधावा, असे सांगितले आहे. 

महापालिका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून पूररेषेच्या बाहेर रस्ता खोदत आहे. हा आमचा एकमेव वहिवाटीचा रस्ता असून तो खोदण्यात येऊ नये, अशी मागणी करत सन प्लॅनेट रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका सादर केली आहे. 

महापालिकेने पूररेषेच्या आतील रस्ता तोडला असून, ते काम पूर्ण केले नाही म्हणून पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान, येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि पुणे शहर अभियंता यांना निवेदन दिले आहे.