'ग्लॅमर'ला भुलून चित्रपटांकडे वळू नका- स्पृहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

वेगवेगळ्या नाटकांच्या फुलांचा गोफ तयार करून 'सकाळ' अशा पद्धतीचा नाट्य महोत्सव आयोजित करतो, याचा मनापासून आनंद आहे. अशा प्रकारच्या महोत्सवाला संवेदनशील प्रेक्षक येतात. विचार करून नाटक पाहणारे प्रेक्षक आम्हाला येथे पाहायला मिळतात.
- स्पृहा जोशी, अभिनेत्री

पुणे : ''चित्रपट किंवा नाटकाचे क्षेत्र चकचकीत, ग्लॅमरस, मजेशीर वाटते म्हणून या क्षेत्रात येऊ नका. हे चित्र वरवरचे आहे. अशा रस्त्यांना भुलू नका. बाहेरून हे क्षेत्र जितके सोपे वाटते त्याहून अधिक कष्ट या क्षेत्रात उतरल्यानंतर दररोज करावे लागतात. मात्र असे कष्ट करण्याची तयारी ठेवणाऱ्यांचे 'इंडस्ट्री' नेहमीच स्वागतच करते,'' असा शब्दांत अभिनेत्री स्पृहा जोशीने बुधवारी चित्रपटात 'करिअर' करू पाहणाऱ्या तरुणाईला सल्ला दिला.

'सकाळ'तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबर या कालावधीत नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात 'डोण्ट वरी बी हॅपी' या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. यानिमित्ताने 'सकाळ फेसबुक लाइव्ह'मध्ये सहभागी होऊन स्पृहाने वाचकांशी मनमोकळा संवाद साधला. अभिनयाची आवड कशी लागली, नाटकात मन रमते की चित्रपटांत, नाटकांबरोबरच चित्रपटात होत असलेले बदल... अशा विविध विषयांवर संवाद रंगत गेला. याप्रसंगी महोत्सवाचे सहप्रायोजक असलेल्या 'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड'चे झोनल हेड सुशील जाधव उपस्थित होते.

स्पृहा म्हणाली, ''या क्षेत्रात तुम्हाला दररोज नव्याने सिद्ध करावे लागते. प्रेझेंटेबल राहावे लागते. अपडेट राहावे लागते. व्यग्र दिनक्रम असतानाही तब्येत उत्तम ठेवावी लागते. याच्या जोडीलाच यश-अपयश, आहार-विहार, अंतर्गत स्पर्धा यामुळे येणारा मानसिक ताणही सांभाळावा लागतो. त्या सर्व बाबींसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची, अडचणींना तोंड देण्याची तयारी हवी. कारण दररोज वेगवेगळी आव्हाने उभी असतात. हे या क्षेत्रात आल्यानंतर कळते. याचा आधीच विचार करा. नाहीतरी एखादे-दुसरे काम मिळाल्यानंतर तो कलाकार पुढे या क्षेत्रात दिसत नाही.''

पूर्वी मालिका, चित्रपट, नाटकात फारशी संधी नव्हती. कारण या कलांमध्ये 'करिअर' करण्याचे रस्ते फारसे खुले नव्हते; पण आता संधी वाढली आहे. एकाच वेळी या तीनही माध्यमांत 'करिअर' करता येऊ शकते. नाटक करूनसुद्धा प्रपंच चालवता येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही किती झोकून देऊन काम करता हे महत्त्वाचे आहे, असे सांगून स्पृहा म्हणाली, ''नाटक हे चांगले असणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार नाटक असेल तर प्रेक्षक कधीच नाटकाकडे पाठ फिरवत नाहीत. उलट 'पुढचा प्रयोग कधी आहे', असे आवर्जून विचारतात. नाटक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण 'सोशल मीडिया'चाही वापर करायला हवा.'' राज्यातील बहुतांश नाट्यगृहांची अवस्था खूपच वाईट आहे. त्यामुळे तेथे प्रयोग होऊ शकत नाहीत, याकडेही स्पृहाने लक्ष वेधून घेतले.
या महोत्सवासाठी मराठे ज्वेलर्स मुख्य प्रायोजक; तर देवधर्स ऍकॅडमी ऑफ एक्‍सलन्स मुख्य सहप्रायोजक आहेत.

लोकांना एकत्र यायला हल्ली वेळच नाही; पण अशा प्रकारच्या महोत्सवांमधून कुटुंबाला एकत्र यायला संधी मिळते. त्यामुळे असे महोत्सव नेहमीनेहमी व्हायला हवेत. ही काळाची गरजच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा महोत्सवातून नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासही मदत होते.
- सुशील जाधव, झोनल हेड, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड

ताणाला इतकेही मोठे बनवू नका
'डोण्ट वरी बी हॅपी' या नाटकात आजच्या काळातील जोडप्याची कथा नाटक आहे. एकमेकांना वेळ देता न येणारे हे जोडपे आहे. तरी ते नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते, असे सांगून स्पृहा म्हणाल्या, ''आपण बाहेरच्या गोष्टींचा ताण खूप घेतो. त्यातून बाहेर पडता येत नाही. अशा स्थितीत आपण एकमेकांवर आरोप करू लागतो. घटस्फोटापर्यंत पोचतो. म्हणून या ताणाला इतकेही मोठे करू नका की आपल्या आयुष्यातील सर्वच घटना, व्यक्ती लहान होतील. ताणाला हद्दपार करून 'डोण्ट वरी, बी हॅपी' म्हणत आयुष्य जगा. नात्यातील ताजेपणा टिकवून ठेवा. रिलेशनशीप हेल्दी बनवा.''

 

'सकाळ' नाट्य महोत्सव
शनिवार (ता. 30) -'साखर खाल्लेला माणूस' (प्रशांत दामले व शुभांगी गोखले)
रविवार (1 ऑक्‍टोबर) -'डोण्ट वरी बी हॅपी' (स्पृहा जोशी व उमेश कामत)
मंगळवार (3 ऑक्‍टोबर)- 'कोडमंत्र' (मुक्ता बर्वे व अजय पूरकर),
बुधवार (4 ऑक्‍टोबर) - 'वेलकम जिंदगी' (भरत जाधव व डॉ. गिरीश ओक)
कोठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
केव्हा : रोज रात्री 9.30 वाजता
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण व वेळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (स. 9 ते 11.30 आणि सायं. 5 ते 8); मराठे ज्वेलर्स, लक्ष्मी रस्ता आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या गणंजय सोसायटी व डहाणूकर कॉलनी शाखा (स. 11 ते सायं. 5)
ऑनलाइन बुकिंगसाठी : www.ticketees.com
अधिक माहितीसाठी संपर्क : 9595830555.