'डेमू' सुरू होण्याची वाट पाहून अखेर खाली उतरले रेल्वे प्रवासी

जनार्दन दांडगे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

डेमू अचानक बंद पडल्याने पुण्याहून येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला थांबविण्याची विंनती केली होती. मात्र अचानकपणे एक्स्प्रेस गाडी थांबविणे शक्य नसल्याचे स्थानक व्यवस्थापकांनी सांगितले.

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेल्वे स्टेशनवर सुमारे दोन तास बंद पडलेल्या डेमू (डिझेल मल्टीपल युनिट) गाडीमुळे सोमवारी (ता. २५) सकाळी प्रवाशांचे मोठे हाल झाले. तसेच नोकरदार व इतर प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. 

पुणे स्टेशन येथून दौंडकडे जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी निघालेली डेमू गाडी १० वाजून १५ मिनिटांनी लोणी स्टेशन येथे दाखल झाली. मात्र गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी सुरु होण्यास दोन तासाचा कालावधी गेला. दरम्यान रेल्वे प्रवासी गोपाल शर्मा व दादा काळे यांनी सांगितले की, डेमू अचानक बंद पडल्याने पुण्याहून येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला थांबविण्याची विंनती आम्ही स्थानक व्यवस्थापकांकडे केली होती. मात्र अचानकपणे एक्स्प्रेस गाडी थांबविणे शक्य नसल्याचे स्थानक व्यवस्थापकांनी सांगितले. तसेच इंजिन दुरुस्ती पथकाला कळविले असून तातडीने दुरुस्ती झाल्यास गाडी पुढे पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले.

पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रतिक्षेत असलेल्या डेमू लोकल सेवा २५ मार्च २०१७ पासून सुरू झाली. मात्र, आजतागायत डेमूमध्ये होणारे तांत्रिक बिघाड, इतर रेल्वे गाड्यांच्या वेळेनुसार बदलणारे डेमुचे वेळापत्र यामुळे प्रवासी संतापले आहेत. डेमूऐवजी पूर्वीची  पुणे-बारामती किंवा इतर पॅसेंजर गाड्यांच्या सेवा चांगल्या होत्या असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.