अखेर त्या शिक्षिकेला अटक; अडीचवर्षीय मुलाला अमानूष मारहाण

मिलिंद संधान
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

काल पत्रकारांच्या कानावर ही गोष्ट पोचली. त्यामुळे या सर्वच गोष्टींची सुत्रे वेगाने फिरली. पोलिसांनी देवच्या घरी धाव घेऊन त्याला पुण्यात केईएम रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले.

नवी सांगवी : अडीच वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला सांगवी पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

भाग्यश्री रवी पिल्ले (वय २९, राहणार विल्यमनगर, पिंपळे गुरव) असे त्या शिक्षिकेचे नाव असून, पोलिसांनी तिला भारतीय दंडविधान कायदा ३२४ व बाल सुरक्षा कायदा ७५ या कलमाखाली आज (ता. १४) अटक केली आहे. याबाबतची तक्रार त्या चिमुरड्याची आई लक्ष्मी संतोशकुमार कश्यप यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पिंपळे गुरव येथील भाऊनगरात मोलमजुरी करून पोट भरणारे हे कश्यप पतीपत्नीने त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा देव याला भाग्यश्रीकडे  सोमवार (ता. ११) दुपारी चार वाजता शिकवणीला पाठवले. सायंकाळी सहा वाजता परत आल्यावर देव याला अमानुष मारहाण झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांच्या पालकांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता चिठ्ठी दिली. तसेच उपचाराचे मेडिकल रिपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितले. परंतु, हे कश्यप कुटूंबीय मुलाच्या आजारपणामुळे पुरते भेदरून गेले होते. 

काल पत्रकारांच्या कानावर ही गोष्ट पोचली. त्यामुळे या सर्वच गोष्टींची सुत्रे वेगाने फिरली. पोलिसांनी देवच्या घरी धाव घेऊन त्याला पुण्यात केईएम रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्याचे वडील संतोश कश्यप यांच्याशी संपर्क साधला असता देव च्या डोक्याला चांगलाच मार लागल्याचे सांगितले. त्याच्या तोंडावरची सूज उतरण्यास वेळ लागणार असल्याचेही सांगितले.