उन्हाची काहिली अंशतः कमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी आठवडाभर होरपळून निघणाऱ्या महाराष्ट्रात रविवारी उन्हाची काहिली अंशतः कमी झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसने कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे 43.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी आठवडाभर होरपळून निघणाऱ्या महाराष्ट्रात रविवारी उन्हाची काहिली अंशतः कमी झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसने कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे 43.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा सुरवातीला सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढला होता. वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट पसरली होती. मात्र, मराठवाडा ते लक्षद्वीप या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जात असल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला. रात्री गार वारे वाहू लागले. त्याचा परिणाम कमाल तापमानावर झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

हवामानाची सद्यःस्थिती 
उत्तर पाकिस्तानमध्ये "वेस्टर्न डिस्टर्बन्स' वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, वायव्य राजस्थानपासून, उत्तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडच्या उत्तरेकडच्या भागातून उत्तर ओरिसापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये हिमाचल प्रदेशासह आंध्र प्रदेश, रॉयलसीमा, सिक्कीम येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता आहे. तेथे वाऱ्याचा वेगही वाढलेला असेल, त्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भातील उन्हाळ्याचा चटका कमी झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

उन्हाची तीव्रता कमी 
राज्यात 46 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले होते. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांत कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. वातावरणातील या बदलांमुळे उन्हाची तीव्रता आता कमी झाली आहे. विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमधील तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. मात्र, अद्यापही बहुतांश शहरांचे तापमान चाळिशीच्या वर नोंदले गेले आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधील उन्हाचा चटका कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. 

पुण्यात आकाश निरभ्र 
शहरात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन 36 अंश सेल्सिअस नोंदले गेले. लोहगाव येथील तापमानही 37.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तेथे या आठवड्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. 

Web Title: In Pune the maximum temperature was 36 degree Celsius