मेट्रो सुटणार सुसाट?

मेट्रो सुटणार सुसाट?

पीआयबीची उद्या बैठक; केंद्राच्या २२०० कोटींच्या निधीबाबत निर्णय

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठीच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत होईल. त्यावर मेट्रो प्रकल्पाचा शहरातील प्रवास अवलंबून असेल. 
 

दोन्ही शहरांतील मेट्रो प्रकल्पाबद्दल गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. मेट्रो भुयारी, की एलिव्हेटेड यावर झालेला खल मिटल्यावर आता मेट्रो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकेल का, याची चाचपणीही सध्या महापालिकेत सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य सरकारचे २२०० कोटी तत्वत: मंजूर झाले असून, केंद्राचा निधी आल्यावर ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे. 

...तेव्हाच प्रकल्प मार्गी
मेट्रो प्रकल्पाला कोणताही फाटा न येता प्रकल्प मंजूर झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळापुढे औपचारिक मंजुरीचा प्रस्ताव सादर होऊन प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर पाच वर्षांत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२०-२१ या वर्षात मेट्रो दोन्ही शहरांतून धावू शकते; मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याबाबतची घोषणा झाल्यावरच प्रकल्प खऱ्याअर्थाने मार्गी लागेल.

महापालिका प्रशासन सज्ज
मेट्रोसाठी दोन्ही महापालिकांनी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली असून, केंद्रीय नगरविकास खात्यातील सचिव तिचे अध्यक्ष असतील. दोन्ही महापालिका आयुक्तांचा, तसेच राज्य सरकार नियुक्त अधिकाऱ्यांचा या कंपनीत समावेश असेल. कंपनीचे एकूण ११ संचालक असतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबतची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
 

मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च - १२ हजार २९८ कोटी रुपये 
६३२५ कोटी रुपयांचे एशिया इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टेमेंट बॅंक आणि जागतिक बॅंक यांचे कर्ज - केंद्र सरकारचे २२०० कोटी, राज्य सरकारचे २२०० कोटी आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे एकूण १२३० कोटी रुपये

मार्ग क्रमांक १ - पिंपरी - स्वारगेट (१६. ५८ किलोमीटर) - ५ किलोमीटर भुयारी व ११. ५७० किलोमीटर एलिव्हेटेड. 
स्थानके - पीसीएमसी, तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, एसएसआय, पुणे महापालिका भवन, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट. या १५ स्थानकांपैकी ६ स्थानके भुयारी, तर ९ स्थानके एलिव्हेटेड 

मार्ग क्रमांक २ - वनाज- रामवाडी (१४. ६५ किलोमीटर) - संपूर्णतः एलिव्हेटेड- 
स्थानके - वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वेस्टेशन, रुबी हॉल हॉस्पिटल, बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी. 

प्रस्तावित भाडे (२०२०-२१)

०-२ कि. मी. - १० रुपये
२-४ कि. मी. - २० रु. 
४-१२ कि. मी. - ३० रु. 
१२-१८ कि. मी. - ४० रु. 
१८ कि. मी. पेक्षा  जास्त - ५० रु. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com