पुणे मेट्रो निगडी-दापोडी रस्त्यामधून धावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

बीआरटीला धक्का न लावता होणार एकात्मिक वाहतुकीचे नियोजन

बीआरटीला धक्का न लावता होणार एकात्मिक वाहतुकीचे नियोजन
पिंपरी - पुणे मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत लवकरच सुरू होणार आहे. पिंपरी ते दापोडी मेट्रोमार्गाच्या कामाची निविदा जाहीर होण्यापूर्वी पिंपरी- चिंचवड हद्दीतील मेट्रो मार्गाच्या आराखड्यात बदल सुचविला असून, आता ही मेट्रो निगडी- दापोडी रस्त्याच्या मधून धावणार आहे. या अगोदर मेट्रो कंपनीने हा मार्ग पदपथाच्या बाजूने निश्‍चित केला होता. या बदलामुळे नियोजित बीआरटी मार्गाला धक्का न लावता बीआरटी, मेट्रो आणि लोकल असे एकात्मिक वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे.

बीआरटी विभागाकडून शनिवारी यासंबंधीची माहिती देण्यात आली. मेट्रो कंपनीने पाहणी केल्यानंतर पहिल्या फेजमध्ये पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्ग निगडी- दापोडी रस्त्याच्या पदपथालगत निश्‍चित केला होता; परंतु त्यामुळे पदपथाच्या खाली असलेल्या सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागल्या असत्या. तसेच, सेवा रस्त्याची रुंदी नऊ मीटरवरून 4.75 मीटर झाल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी झाली असती. शिवाय, प्रत्येक मेट्रो स्टेशनसाठी 5 ते 7 मीटर रुंद व 140 मीटर लांब क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्‍यकता निर्माण झाली असती. त्यामुळे प्रकल्पाला आणखी उशीर झाला असता. या मार्गावरील 650 झाडेही तोडावी लागली असती. या तांत्रिक बाजू बीआरटी विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी निगडी- दापोडी एक्‍स्प्रेस मार्ग (ग्रेडसेपरेटर) व नियोजित बीआरटी मार्ग यांच्या मधील दोन मीटर रुंद डिव्हायडरमधून मेट्रो मार्गाची आखणी करून महापालिका आयुक्तांना त्याचे सादरीकरण केले होते. आयुक्तांनी हे सादरीकरण महा मेट्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना गेल्या महिन्यात दाखविले. मेट्रोच्या मार्गात अडचणी येऊ नयेत म्हणून "महामेट्रो'ने पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या या तांत्रिक बाजू मान्य केल्या. निगडी- दापोडी मेट्रो मार्ग एक्‍स्प्रेस मार्ग व बीआरटी मार्ग यांच्यामध्ये 2 मीटर रुंदीच्या मार्गातून उभारण्यास मान्यता दिली असून, महामेट्रो कंपनीने पत्राद्वारे तसे महापालिकेला कळविले असल्याचे बीआरटीचे प्रवक्ता विजय भोजने यांनी "सकाळ'ला सांगितले. या बदलामुळे बीआरटी, मेट्रो आणि लोणावळा- पुणे लोकलमार्ग अशा तीनही मार्गांचे सार्वजनिक वाहतुकीच्यादृष्टीने एकात्मिक नियोजन (इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट प्लॅनिंग) करता येणार आहे.

पिंपरी- चिंचवड शहरांतर्गत मेट्रोची वैशिष्ट्ये
* स्टेशनची संख्या सहा - पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी (फोर्ब्ज मार्शल समोर), फुगेवाडी (जकात नाक्‍यासमोर) आणि दापोडी (अरुण टॉकीज)
* मेट्रो - पूर्णत: एलिव्हेडेड
* मेट्रो मार्गाचे अंतर - 7.15 किलोमीटर
* मेट्रो धावणार - दर 3.30 मिनिटाला एक मेट्रो
* प्रवासी नेण्याची क्षमता - एकावेळी 900
* मेट्रो, बीआरटी व लोकल सेवांची एकात्मिक सुविधा मिळणार

पुणे मेट्रो कंपनीने तांत्रिक बाजू समजून घेत या मेट्रोमार्गाची पुन्हा आखणी करण्यास मान्यता दिली, त्यामुळे प्रकल्पाचा वेळ आणि आर्थिक नुकसानही टाळता येईल. याचे निश्‍चितच समाधान आहे.
- राजन पाटील, सहशहर अभियंता (बीआरटी विभाग, पिंपरी- चिंचवड)