घड्याळाच्या बुरुजांना भाजपचा धक्का

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबईनंतर पुण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याचे कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगर पालिकांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजपने दिलेले जबरदस्त आव्हान... आणि भाजपने ते खरे करूनही दाखवले.

पुणे महापालिका ही मुंबईनंतर सर्वांत महत्त्वाची समजली जाते. 162 नगरसेवकांच्या पुणे 'मनपा'मध्ये भाजप स्वबळावर सत्तेजवळ पोचला आहे, तर पिंपरीमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला जोरदार धक्का देत स्पष्ट बहुमत मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील एकछत्री नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. या निकालांचे दूरगामी परिणाम होणार असल्याने भविष्यात अनपेक्षित अशी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली तर आश्‍चर्य वाटायला नको! 

पुणे आणि पिंपरीच्या निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, त्यामुळे अजित पवार यांनी सुरवातीपासून येथेच मुक्काम ठोकला. राष्ट्रवादीने सर्व ताकद लावूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पालिकांमध्ये झालेला पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 51 जागा मिळाल्या होत्या; परंतु आता चाळिशीपर्यंत पोचतानाही पक्षाची दमछाक झाली. याउलट भाजपने 26 जागांपासून बहुमताच्या दिशेने मुसंडी मारत यश मिळवले.

मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 35 ते 40 जणांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यातील बरेच उमेदवार विजयी झाले आहेत. विधानसभेसाठी भाजपने आखलेले डावपेच 'मनपा'साठीही यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. काँग्रेस, मनसे या पक्षांचे प्रभावी संघटन प्रथमपासून दिसून आले नाही. काँग्रेसला मागच्या (28) तुलनेत अर्ध्याच जागा मिळणार असे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अर्धवट आघाडीनेही उभय पक्षांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक वाताहत झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. गेल्या वेळी 29 जागा जिंकणारा हा पक्ष आता दोन आकडी संख्याही गाठू शकलेला नाही. पक्षाचे 'खात्रीचे' नगरसेवकही पराभूत झाले. या वेळी 'नोटा'मध्ये झालेली प्रचंड वाढ सर्वच पक्षांना चिंता व्यक्त करायला लावणारी आहे, यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार देताना ते चांगल्या चारित्र्याचे आणि सुशिक्षित असतील याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

मुख्यमंत्र्यांची रणनीती यशस्वी 
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या रणनीतीचा भाजपला खूप फायदा झाला. राष्ट्रवादीचे जुने-जाणते नेते आपल्याकडे वळविण्याचे आणि त्यांना अधिकार देण्याचे धोरण त्यांनी पिंपरीमध्ये राबविले, तसेच पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जोडीला खासदार संजय काकडे यांनाही मर्यादित नेतृत्व देऊन नवे राजकीय डावपेच आखण्यात आले होते, तेही कमालीचे यशस्वी ठरले. पुणे, पिंपरीच्या विजयाचे श्रेय खरे तर मुख्यमंत्र्यांच्या रणनीतीलाच द्यायला हवे. बापट आणि काकडे यांच्यातील बेबनाव निवडणुकीआधी आणि नंतरही अनेकदा चव्हाट्यावर आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता. मात्र भविष्यात पुण्याचे नेतृत्व कुणाकडे यावरून त्यांच्यात कसा समन्वय राहतो, यावर पक्षाची वाटचाल अवलंबून असेल. दुसरीकडे भाजपच्या कामगिरीचे विश्‍लेषण 'बाका' विजय असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. 'बा' म्हणजे बापट आणि 'का' म्हणजे काकडे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडांना प्रवेश दिल्याचा आरोप काकडेंवर झाला होता. त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे सर्वांचेच लक्ष राहील. 

पिंपरीतही 'कमळा'चा जोर 
वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी - चिंचवड देशपातळीवर चर्चेत असायचे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्याचा फायदा घेत अजित पवार यांनी तेथे विकासकामांत मोठी आघाडी घेतली. मात्र त्यांचे विश्‍वासू सहकारी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे आदी मातब्बर मंडळी एकेक करत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेली. त्यामुळे भाजपची ताकद वाढली होती. परंतु तरीही भाजप नगरसेवकांची संख्या दोनवरून राष्ट्रवादीलाही मागे टाकेल, असे वाटत नव्हते. पुणे आणि पिंपरी ही अजित पवार यांची शक्तिस्थाने संपविण्याचा चंग मुख्यमंत्र्यांनी बांधला होता. त्यामुळे त्यांचा नेत्यांशी थेट संपर्क होता. या डावपेचांत भाजपची सरशी झाली. मात्र राष्ट्रवादीची एवढी मोठी पीछेहाट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पक्षाच्या नगरसेवकविंची संख्या 82 वरून चाळीसच्या आत आली आहे. आर. एस. कुमारसारखे खंदे कार्यकर्ते आणि माजी महापौरही पराभूत झाले. अजित पवार यांनी पिंपरी - चिंचवडवर अधिक लक्ष दिले होते. तेथे त्यांच्या सुमारे पंधरा सभा झाल्या. मात्र भोसरी, चिंचवड या पट्ट्याने भाजपला भरभरून मते दिली. पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि मत चाचण्यांचे सर्व अंदाज खोटे ठरवत पिंपरीत भाजपने 'कमळ' फुलवले आहे; मात्र या पक्षात राष्ट्रवादीमधून आलेली मंडळी खूप महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना सांभाळण्याचे आव्हान आगामी काळात भाजपला पेलावे लागणार आहे. पिंपरीत सत्ता मिळवून दिल्यास मोठ्या पदांची बक्षिसे देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणाला लाल दिवा मिळतो याकडेही सर्वांचे लक्ष असेल. 

जिल्ह्यात राष्ट्रवादीच पुन्हा! 
पुणे जिल्हा परिषदेवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व केवळ अबाधित राहिले नाही, तर आणखी वाढले. 75 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची सदस्य संख्या 42 वरून या वेळी 47 झाली आहे. जि.प.वरील अजित पवारांचा दबदबा त्यामुळे कायम राहिला. स्वत: त्यांच्या बारामती मतदारसंघात जि.प.चे सर्व सहा आणि पंचायत समितीचेही सर्व 12 उमेदवार विजयी झाले. दुसरे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातही राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. आमदार राहुल कुल यांची जि.प.मधील सदस्य संख्या 3 वरून 1 आणि पं.स.मधील संख्या 7 वरून 2 वर आली. आमदार म्हणून त्यांच्यासाठी हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातुःश्री विजयी झाल्या. राष्ट्रवादीला 13 पैकी सात, शिवसेनेला तीन, काँग्रेसला दोन आणि भाजपला एका पंचायत समितीवर यश मिळाले. गेल्या वेळी पाच समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. 
पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी पंचायत समितीच्या सहा आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या. सेनेला मागच्यापेक्षा दोन पंचायत समित्या अधिक मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवतारे यांचे राजकीय वजन वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com