शहरात आजपासून सर्वत्र फवारणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

पुणे - डेंगी आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात शुक्रवारपासून (ता. 23) एकाच वेळी कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व इमारतींसह रस्ते आणि नदीपात्रालगतच्या पाण्याच्या डबक्‍यांमध्ये फवारणी करण्यात येणार आहे. या उपाययोजनांनंतर पुढील पाच दिवसांत डेंगीची उत्पत्ती करणारे डास संपुष्टात आणण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिली. 

पुणे - डेंगी आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात शुक्रवारपासून (ता. 23) एकाच वेळी कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व इमारतींसह रस्ते आणि नदीपात्रालगतच्या पाण्याच्या डबक्‍यांमध्ये फवारणी करण्यात येणार आहे. या उपाययोजनांनंतर पुढील पाच दिवसांत डेंगीची उत्पत्ती करणारे डास संपुष्टात आणण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिली. 

रखडलेल्या बांधकामांच्या ठिकाणीही पाणी साठले जात असल्याने बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा देण्यात येणार असून, घर, बंगल्यांची तपासणी करून डेंगीची उत्पत्ती करणारे डास आढळून आल्यास कारवाई करणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. 

डेंगी आणि चिकुनगुनिया रोखण्यासाठी नेमक्‍या कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठी महापौर जगताप यांनी महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांची बैठक घेतली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. 

जगताप म्हणाले, ‘डेंगी आणि चिकुनगुनियाच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे या आजारांना पोषक वातावरण असल्याने खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहराच्या सर्वच भागात एकाच वेळी फवारणी केली जाईल. त्यासाठी 50 खासगी एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. रस्त्यांवर पडलेला कचरा आणि महापालिकेच्या मालकीच्या जागेतील जुन्या वस्तू उचलल्या जातील. ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्‍यता आहे, त्या ठिकाणी औषध फवारणी केली जाईल.‘‘ 
 

‘रस्त्यांवरील राडारोडा तातडीने उचलला जाणार असून, आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी रस्त्यावर उतरवून 30 तारखेपर्यंत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे,‘‘ असेही महापौरांनी सांगितले. 

खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टर बोलविणार 
शहरात साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. त्यात, काही डॉक्‍टर सध्या आजारी असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये, त्यासाठी खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्याचे नियोजन असल्याचे जगताप यांनी सांगितले. या संदर्भात ससून रुग्णालयातील शिकाऊ डॉक्‍टर बोलविले जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

डेंगी आणि चिकुनगुनियामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. ती दूर करण्याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व उपाययोजना प्रभावीपणे केल्या जाणार आहेत. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले.