शिवसेनेकडेही इच्छुकांचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

सातत्याने अपयश मिळणाऱ्या प्रभागांसाठी नवा पॅटर्न  

पुणे - आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती होवो अथवा ना होवो. मात्र, महापालिकेतील आपले संख्याबळ वाढविण्याच्या उद्देशाने शिवसेना अन्य राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना रिंगणात उतरविण्याचे आडाखे बांधत आहे. ज्या वॉर्ड आणि प्रभागांमध्ये सलग पराभव झाला, त्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेना आता ‘आयाती’चे धोरण राबविण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेतील सहकारनगर-पद्मावतीमधील (प्रभाग क्र. ३५) एका प्रस्थापित नेत्याच्या कार्यकर्त्याला पक्षात घेऊन, त्याला तिकीट देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यादृष्टीने अन्य प्रभागांमध्येही चाचपणी सुरू आहे.

निवडणुकीला दोन-अडीच महिन्यांचा कालावधी राहिला असला तरी भाजप आणि शिवसेना ‘युती’बाबत साशंकता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांना शह देण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सर्व प्रभागांमधील इच्छुकांची चाचपणी सुरू झाली असून, त्यांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

परंतु, गेल्या काही निवडणुकांमध्ये सलग पराभव झालेल्या प्रभागांमध्ये तगडे उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य पक्षांतील उमेदवार गळाशी लागतात का? यादृष्टीने पक्षाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागांमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 

नाराजी टाळणार का?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्याच्या हालचालींमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्‍यता आहे; परंतु बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत पक्षाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नाराजी टाळता येणार आहे. उमेदवारीबाबत सामूहिक निर्णय घेतले जातील, असेही स्पष्ट केले.

निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार देणार आहोत. प्रभागनिहाय चाचपणी करण्यात येत आहे. अन्य पक्षांमधील कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. आणखी काही कार्यकर्ते प्रवेश करतील. मात्र, यापूर्वी सातत्याने अपयश आलेल्या प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.

- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना