3432 केंद्रे, 20 हजार कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; कडेकोट पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन

पुणे- महापालिका निवडणुकीसाठी शहरातील 3 हजार 432 केंद्रांवर मंगळवारी (ता. 21) मतदान होणार आहे. 927 इमारतींमध्ये ही केंद्रे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यरत राहणार असून, त्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; कडेकोट पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन

पुणे- महापालिका निवडणुकीसाठी शहरातील 3 हजार 432 केंद्रांवर मंगळवारी (ता. 21) मतदान होणार आहे. 927 इमारतींमध्ये ही केंद्रे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यरत राहणार असून, त्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवारी (ता. 23) 14 ठिकाणी होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी आणि विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. शहरात 26 लाख 34 हजार 800 मतदार असून, एक लाख 68 हजार नवमतदार आहेत. निवडणूक शाखेकडे आचारसंहिता भंगाच्या 32 तक्रारी आल्या असून, त्यातील 29 तक्रारींचा निपटारा केला आहे. अन्य तीन तक्रारींबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, मतदारांना मतदान केंद्रांची माहिती आणि त्यांच्या नावाचा तपशील असलेल्या स्लिपा (मतदान पत्रिका) घरपोच देण्याचे काम 30 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित दोन दिवसांत ते संपेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

संकेतस्थळांवर माहिती
महापालिकेच्या संकेतस्थळावर (punecorporation.org) याद्या उपलब्ध केल्या आहेत. तसेच, votersearch.punecorporation.org आणि pmcvotersearch.org या संकेतस्थळांवर मतदारांना त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन संगणक प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदाराला त्याचे नाव किंवा विधानसभा मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक किंवा व्होटर आयडी क्रमांक टाकूनही त्याचे नाव मतदार यादीत शोधता येणार आहे. मतदारांना मतदार क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी टोल फ्री क्रमांक 180001030222 उपलब्ध करून दिला आहे. रविवार (ता. 19) पासून सकाळी आठ ते रात्री अकरा आणि सोमवारी (ता. 20) व मंगळवारी (ता. 21) सकाळी सहा ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत त्यावर माहिती मिळेल. महापालिकेच्या ऍपच्या माध्यमातूनही मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

145 मतदान केंद्रे संवेदनशील
शहरात 145 मतदान केंद्रे संवेदनशील असून, एकही केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे उपायुक्त पाठक यांनी सांगितले. चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 84, डेक्कनमध्ये 8, खडक व फरासखानामध्ये प्रत्येकी 7, हडपसरमध्ये 6 आणि चंदननगर, कोथरूड, सिंहगड रस्त्यावर प्रत्येकी 2 केंद्रे संवेदनशील आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांना 020-25506644 किंवा 6645 या दूरध्वनी क्रमांकावर; तसेच 9689937645 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्‌सऍपद्वारेही तक्रार करता येतील. तसेच, लेखी स्वरूपातील तक्रार mcc.election@punecorporation.org या ई-मेलवरही करता येतील, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

सावरकर भवनमध्ये माहिती
शहरातील मतदानाची टक्केवारी आणि निकालाचे अपडेट्‌स महापालिकेच्या सावरकर भवन कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक तासाला त्याचा तपशील जाहीर करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मतदान वाढण्यासाठी उपक्रम
मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून महापालिका प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत हॉटेल असोसिएशनने मतदान केलेल्या मतदारांना त्या दिवशी मिष्टान्नाची एक प्लेट मोफत देण्याची घोषणा केली आहे, तर शहरातील पेट्रोल पंप डीलर असोसिएशन आणि क्रेडाई संस्थेने स्क्रॅच कार्ड योजनेअंतर्गत एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची घोषणा केली आहे. मतदान केंद्रातील पहिल्या 100 मतदारांसाठी ही योजना लागू असेल. पीएमपीमधील जाहिरात संस्थेने 300 बसवर मतदानासाठी मोफत जाहिराती करण्याचे जाहीर केले आहे. तसेच, मल्टिफ्लेक्‍स असोसिएशननेही मतदान केलेल्या मतदारांना तिकिटाच्या रकमेत 15 टक्के सवलत देण्याचे घोषित केले आहे.

Web Title: pune municipal election