टक्‍क्‍यांची धाव निम्म्यावरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पन्नास टक्के मतदान; याद्यांतील घोळ, यंत्रणेतील त्रुटींचा फटका
पुणे - शहराच्या मध्य भागातून कमी झालेले मतदान तर, उपनगरांतून उत्साहाने झालेले मतदान, हे यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाचे वैशिष्ट्य ठरले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपेक्षा अवघे काही टक्के जास्तच मतदान झाले असले, तरी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटताना दिसली.

पन्नास टक्के मतदान; याद्यांतील घोळ, यंत्रणेतील त्रुटींचा फटका
पुणे - शहराच्या मध्य भागातून कमी झालेले मतदान तर, उपनगरांतून उत्साहाने झालेले मतदान, हे यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाचे वैशिष्ट्य ठरले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपेक्षा अवघे काही टक्के जास्तच मतदान झाले असले, तरी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटताना दिसली.

महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत 51.4 टक्के मतदान झाले होते; तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत शहरात 54. 25 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी सुमारे 50 टक्के मतदान झाले आहे.

मतदार याद्यांतील घोळ, हे मतदान कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील याद्यांमध्ये असणे, कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव मतदारयादीत नसणे, मतदारयादीतून नाव वगळणे, हेही एक महत्त्वाचे कारण ठरले. मतदान केंद्रांची संख्या वाढली असली, तरी घराजवळच्याच मतदार केंद्रात मतदारांची नावे नव्हती. त्यामुळे मतदार केंद्र शोधून तेथे जाऊन मतदान करावे लागत होते. निवडणूक आयोगाकडून वाटल्या जाणाऱ्या स्लिपा बहुसंख्य मतदारांपर्यंत पोचल्या नव्हत्या. त्यामुळे मतदारांना राजकीय पक्षांवरच अवलंबून राहावे लागत होते. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान झाले. उमेदवारांची नावे तीन किंवा चार, पाच, सहा इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) होती. त्यातून हव्या असलेल्या उमेदवाराचे नाव शोधून त्याला मतदान करण्यास ज्येष्ठ नागरिकांना वेळ लागत होता. प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीदेखील मतदान कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे होते.

अभय छाजेड (कॉंग्रेस) - राजकीय पक्षांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडून फार कमी वेळ मिळाला. त्यातच चार सदस्यीय प्रभाग, वेगवेगळे गट, मतदारांची वाढलेली संख्या आणि मतदारयाद्यांतील घोळ, याचा परिणाम झाल्यामुळे मतदान कमी झाल्याचे दिसते.

गोपाळ चिंतल (भाजप) - 'चार सदस्यांचे प्रभाग होते. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली होती. मतदारयादीतील घोळामुळे एखाद्या ठिकाणी नाव नसणे, नाव न सापडणे आदी प्रकार घडले आहेत. तसेच मतदारयादी प्रत्येक वेळी बदलत गेली. 8, 12 आणि 21 जानेवारीची मतदारयादी वेगवेगळी होती. त्यामुळे अनेक मतदारांत संभ्रम निर्माण झाला. परिणामी, अपेक्षेनुसार मतदान झाले नाही.''

Web Title: pune municipal election percentage