आम्हीच नंबर वन!

आम्हीच नंबर वन!

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा

पुणे - मतदानाची वाढलेली टक्केवारी विचारात घेता त्याचा फायदा आम्हालाच होऊ शकतो, असा दावा सर्वच पक्षांतील जाणकार नेते मंडळींकडून केला जात असला; तरी एकहाती सत्ता मिळेल का, यावर कोणीच भाष्य करण्यास तयार नाही. मात्र, महापालिकेत एक नंबरचा पक्ष आमचाच राहील, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

महापालिकेसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी सुमारे साडेचार टक्‍क्‍यांनी वाढली. एकूण ४१ प्रभागांपैकी सात ते आठ प्रभागांत पन्नास टक्‍क्‍यांच्या आतच मतदान झाले असून, अन्य प्रभागांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणताही एक विधानसभा मतदारसंघ हा एका पक्षाचा बालेकिल्ला आहे, असे म्हणता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर सर्व पक्षांतील तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता, ‘आमच्या जागा वाढतील,’ यापुढे कोणीही सरकण्यास तयार नाही.

भाजपचीच बाजी
वेगवेगळ्या कंपन्या आणि टीव्ही चॅनेलच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये पुण्यात भाजप एक नंबरचा पक्ष होईल, असे सांगितले जात आहे. त्यास पक्षातील जाणकार नेत्यांकडून दुजोरा दिला जात आहे. सत्तर ते पंचाहत्तरपर्यंत भाजपला जागा मिळतील, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. अद्यापही मोदीलाट आहे, असे कारणही पुढे केले जात आहे.

शिवसेना किंगमेकर
स्वबळावर रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्याही आशा पल्लवित 
झाल्या आहेत. गेल्या वेळेपेक्षा यंदा आमच्या जागा वाढतील, असा दावा त्या पक्षातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. वीस ते तीसदरम्यान आमच्या पक्षाला जागा मिळतील. आमच्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही, असा विश्‍वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

‘राष्ट्रवादी’च ‘टॉप’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील जाणकारांच्या मते भाजप साठ जागांपर्यंत जाऊ शकतो. राष्ट्रवादी हाच महापालिकेत नंबर एकचा पक्ष राहणार आहे. पक्षाकडून उमेदवारीवाटप करताना घेतल्या गेलेल्या काळजीमुळे पॅनेलही स्ट्राँग आहेत, याचा विचार करता आम्ही ६५ ते ७० जागांपर्यंत जाऊ, असा त्यांचा दावा आहे.

काँग्रेस २५ च्यापुढेच
गेल्या वेळेस मिळाल्या तेवढ्या जागा तरी मिळतील का नाही, याबाबत काँग्रेसवाले साशंक आहेत. तिकीटवाटपात झालेला गोंधळ, नेतृत्वाचा अभाव आणि प्रचारातील विस्कळितपणाचा आम्हाला फटका बसेल; तरीदेखील २५ पेक्षा कमी जागा पक्षाला मिळणार नाहीत, असा दावा काँग्रेसमधील जाणकारांकडून करण्यात येत आहे.

मनसेला दहा जागा निश्‍चित
युतीतील फुटीचा फायदा आम्हाला होऊ शकतो, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. गेल्या वेळेएवढ्या जागा आम्हाला मिळतील, अशी परिस्थिती नसली, तरीदेखील आठ ते दहा जागा मिळतीलच, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. २३) मतपेटीतून बाहेर पडणाऱ्या निकालानंतरच महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे कळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com