अकरा प्रभाग समित्या भाजपकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

राष्ट्रवादी तीन, कॉंग्रेस एक; "एमआयएम'ची भाजपला साथ 
पुणे - महापालिकेच्या 15 पैकी 11 प्रभाग समित्या अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन आणि कॉंग्रेसला एका समितीचे अध्यक्षपद मिळाले. प्रभाग समित्यांच्या नव्या अध्यक्षांच्या नावांची सोमवारी दुपारी घोषणा झाली. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसला साथ देणाऱ्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. 

महापालिकेच्या विविध 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यात सहा समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. त्यातील पाच जागांवर भाजप; तर एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. उर्वरित नऊ प्रभाग समित्यांसाठी मतदान झाले. त्यात सहा समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले. दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एका ठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. 

या निवडणुकीसाठी भाजपविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आले होते. त्यात येरवडा प्रभाग समितीसाठी भाजप व शिवसेना यांची समान मते होती. मात्र "एमआयएम'च्या नगरसेवकाने भाजपला मतदान केल्याने या समितीचे अध्यक्षपद भाजपला मिळाले. त्यामुळे सेनेला एकाही ठिकाणी संधी मिळू शकली नाही. राज्याचे मुद्रांक शुल्क व नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. 

दरम्यान, भाजपला साथ देण्याच्या "एमआयएम'च्या भूमिकेवर शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि नगरसेवक नाना भानगिरे यांनी टीका केली. 

प्रभाग समित्या व त्यांचे अध्यक्ष 
औंध-बाणेर - विजय शेवाळे (भाजप) 
शिवाजीनगर-घोले रस्ता - आदित्य माळवे (भाजप) 
सिंहगड रस्ता - श्रीकांत जगताप (भाजप) 
वानवडी-रामटेकडी - परवीन हाजी फिरोज (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
कोंढवा-येवलेवाडी - रंजना टिळेकर (भाजप) 
कसबा-विश्रामबाग - राजेश येनपुरे (भाजप) 
बिबवेवाडी - मानसी देशपांडे (भाजप) 
नगर रस्ता-वडगाव शेरी - शीतल शिंदे (भाजप) 
येरवडा-कळस - किरण जठार (भाजप) 
ढोले पाटील रस्ता - चॉंदबी हाजी नदाफ (कॉंग्रेस) 
कोथरूड-बावधन - दिलीप वेडे पाटील (भाजप) 
धनकवडी-सहकारनगर - अश्‍विनी भागवत (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
वारजे-कर्वेनगर - सुशील मेंगडे (भाजप) 
हडपसर-मुंढवा - योगेश ससाणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
भवानी पेठ - अजय खेडेकर (भाजप)